संजीवनी अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्याला देशात प्रथम क्रमांकाचा स्कॉच अवॉर्ड
हिंगोली (Collector Rahul Gupta) : हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांच्या संकल्पना व प्रेरणेने तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या ‘संजीवनी अभियाना’ला देशपातळीवर प्रथम क्रमांकाचा स्कॉच अवॉर्ड मिळाला आहे. या यशस्वी अभियानासाठी जिल्हाधिकारी गुप्ता यांना २० सप्टेंबर २०२५ रोजी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्हा परिषद आरोग्य विभाग व सामान्य रुग्णालय हिंगोली यांच्या माध्यमातून या अभियानांतर्गत महिलांमध्ये गर्भाशयमुख व स्तन कर्करोग तसेच पुरुष व महिलांमध्ये मुखकर्करोगाची तपासणी करण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय महिला दिन, दि. ८ मार्च २०२५ रोजी आमदार तानाजी मुटकुळे व मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या हस्ते करण्यात आले होते.
ग्रामीण व शहरी भागात आशा स्वयंसेविकांमार्फत ३० वर्षांवरील पुरुष व महिलांचे सर्वेक्षण करून संशयित रुग्णांची यादी तयार करण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी व तज्ञांच्या साहाय्याने तपासणी करून ‘लवकर निदान-लवकर उपचार’ ही संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात आली.
या अभियानाचे संपूर्ण सादरीकरण जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी राष्ट्रीय स्तरावर केले होते. देशभरातून निवड झालेल्या अभियानांमध्ये हिंगोली जिल्ह्याच्या ‘संजीवनी अभियाना’ला प्रथम क्रमांक मिळून हिंगोलीने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




 
			 
		

