विविध शासकीय योजनांच्या १५०० लाभार्थ्यांना मंजुरी आदेशांचे केले वितरण
देशोन्नती वूत्तसंकलन
चिखली (MLA Shweta Mahale) : समाजातील विविध घटकांच्या उत्थानासाठी महायुतीचे सरकार पूर्वीपासून सुरू असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी तर करतच आहे याशिवाय अनेक नवीन योजना सुद्धा पारदर्शकपणे राबवत आहे. परंतु, विरोधी पक्षाकडून जनहिताच्या योजनांमध्ये खोडा घालण्याचे काम सुरू आहे. तरी देखील या विरोधाला न जुमानता राज्य सरकार प्रत्येक पात्र लाभार्थीला लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न सरकार करत असून समाजातील सर्व घटकांनी आपल्यासाठी असलेल्या या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शासनाला सहकार्य करावे असे आवाहन आ. श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) यांनी केले. दि. २ ऑक्टोबर रोजी स्थानिक मौनी महाराज संस्थानमध्ये आयोजित संजय गांधी व श्रावण बाळ योजनेच्या मंजुरी आदेश वाटप व विविध लाभ वाटप शिबिरात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
तहसील विभागाच्या वतीने तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या लाभार्थ्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचे आदेश सुपूर्द करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार संतोष काकडे, नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड, भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख अनीस, माजी शहराध्यक्ष सुरेंद्रप्रसाद पांडे, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन मोरे, पिरिपाचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई, भाजपा शहर सरचिटणीस युवराज भुसारी यांच्यासह अन्य मान्यवर याप्रसंगी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार संतोष काकडे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना चिखली तालुक्यात आ. श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाकडून राबवल्या जात असून कोणीही पात्र लाभार्थी वंचित राहू नये याचा प्रयत्न शासकीय यंत्रणेकडून होत असल्याचे काकडे म्हणाले. शहराध्यक्ष पंडितराव देशमुख आणि शेख अनीस यांची सुद्धा याप्रसंगी समायोजित भाषणे झाली. श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, नैसर्गिक आपत्ती मदत योजना तसेच रेशन कार्डचे वितरण या कार्यक्रमात करण्यात आले. एकूण १५०० लाभार्थ्यांपैकी ५० लाभार्थींना आ. श्वेताताई महाले व मान्यवरांच्या हस्ते योजनेच्या लाभाचे आदेश वितरित केले गेले.
१० वर्षांपासून रेशन कार्ड नसलेल्यांना मिळाल्या शिधापत्रिका
सदर कार्यक्रमात श्रावण बाळ योजनेतील १५ लाभार्थ्यांना, संजय गांधी योजनेतील १० लाभार्थ्यांना व नैसर्गिक आपत्ती मदतीने अंतर्गत पशुधन गमावलेल्या नऊ लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात योजनेच्या लाभाची प्रमाणपत्रे देण्यात आली. याच कार्यक्रमात तालुक्यातील सावंगी गवळी येथील नागरिकांना देखील रेशन कार्डचे वितरण झाले. विशेष म्हणजे सावंगी गवळी या गावातील अनेक नागरिकडे गेल्या दहा वर्षांपासून रेशन कार्ड नव्हते. त्यांनी गेल्या आठवड्यात आ. श्वेताताई महाले यांची भेट घेऊन आपली व्यथा आमदारांना सांगितली. लगोलग या गोष्टीची दखल घेऊन आ. महाले यांनी तहसीलदार संतोष काकडे यांना निर्देश देत अपुऱ्या कागदपत्रांची तातडीने पूर्तता करून घेत गावातील रेशन कार्ड पासून वंचित असलेल्या नागरिकांना शिधापत्रिका उपलब्ध करून दिल्या. या रेशन कार्डचे वितरण आजच्या कार्यक्रमात आ. श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) यांच्या हस्ते करण्यात आले.
९ ऑक्टोबरला होणार प्रमाणपत्रांचे वितरण
आज पासून पुढे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईपर्यंत तालुक्यातील शासकीय कल्याणकारी योजनांच्या पात्र लाभार्थींना योजनेच्या मंजुरी आदेशांचे वितरण करण्याचा धडक कृती कार्यक्रम आ. श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) यांच्या संकल्पनेतून महसूल विभागाने हाती घेतला आहे. या अंतर्गत आवश्यक त्या कागदपत्रांची लाभार्थींकडून पूर्तता करून त्यांची नाव नोंदणी करण्यासाठी दोन स्वतंत्र केंद्रे चालवली जाणार आहेत. कार्यालयीन वेळेत सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत येथे नाव नोंदणी करण्यात येईल. येत्या ९ ऑक्टोबर रोजी नोंदणीकृत सर्व पात्र लाभार्थींना आदेशांचे वितरण आदेशाचे वितरण करण्यात येईल.