सेनगाव (Blackbuck poaching case) : तालुक्यातील धनगरवाडी शिवारात १६ ऑगस्ट रोजी झालेल्या काळवीट शिकारीच्या प्रकरणात वन विभागाने फरार असलेल्या चार आरोपींना अटक केली आहे. तपासादरम्यान आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, वन विभागाने गुन्ह्यात वापरण्यात आल्याचा संशय असलेल्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
या (Blackbuck poaching case) प्रकरणी वनपरिक्षेत्र प्रादेशिक सेनगाव अंतर्गत वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून देवीदास भिकाजी इंगळे, भीमराव विश्वनाथ दिपके, भागवत प्रभाकर कोकाटे आणि महादेव नामदेव दुभाळकर (सर्व रा. पळशी, ता. सेनगाव) हे फरार झाले होते. दरम्यान, चारही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी हिंगोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने सुनावणीनंतर त्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले. त्यानंतर वन विभागाने ६ सप्टेंबर रोजी हिंगोली येथे चारही आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींना ७ सप्टेंबर रोजी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, सेनगाव यांच्यासमोर हजर करण्यात आले.
गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी तसेच गुन्ह्यात वापरलेले साहित्य व मुद्देमाल जप्त करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने ९ सप्टेंबरपर्यंत वन कोठडी मंजूर केली. वन कोठडीदरम्यान केलेल्या तपासात आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार एमएच ३८ एसी ३०८४ आणि एम एच ३८ ए एफ ९१८९ क्रमांकाच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या वाहनांसह शिकारीसाठी वापरण्यात आलेल्या इतर संभाव्य साहित्य व मुद्देमालाचा शोध वन विभागाकडून सुरू आहे.
या (Blackbuck poaching case) प्रकरणाचा पुढील तपास विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे व सहायक वनसंरक्षक एस. आर. माने यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी एम. एस. केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. तपास पथकात वनपाल जी. पी. मिसाळ, जी. एस. चाटे, वनरक्षक व्ही. आर. मुदीराज, पी. टी. केंदळे, एस. सी. तनपुरे, जी. आर. घुगे, विलास चाटसे, एस. व्ही. कचरे, सचिन ढगे, एम. टी. शिंदे व बबन राठोड यांचा समावेश आहे.