एलसीबीचा छापा, १० जुगारी पकडले रंगेहाथ
मानोरा (Manora Gambling Den Raid) : मानोरा शहराच्या मध्यवर्ती असलेल्या भाजी मंडी परिसरात दिवसाढवळ्या जुगाराचा अड्डा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. दि. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी पोलिसांनी अचानक धाड टाकून जुगार खेळणाऱ्या १० जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ४४,७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात असताना एलसीबीला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मानोरा शहरातील भाजी मंडीच्या आड जुगार अड्डा सुरू होता. माहितीची खातरजमा करून एलसीबीच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला असता, तेथे १० जण पैसे लावून जुगार खेळताना आढळले.
पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, १० मोबाईल हँडसेट आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ४४ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या (Manora Gambling Den Raid) प्रकरणी पोलिसांनी जुगार ऍक्ट अन्वये संतोष ढळे, मनोहर राऊत, विनोद चव्हाण, अशोक तायडे, नितेश राठोड, रामेश्वर राठोड, राजेश आडे, अब्दुल शहीद, सलीमोद्दीन रहिमोद्दीन, रणजीत जाधव (सर्व रा. मानोरा) यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास मनोरा पोलिस करीत असुन शहराच्या वर्दळीच्या ठिकाणीच जुगार अड्डा सुरू असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. या कारवाईमुळे शहरातील इतर अवैध जुगार अड्डा चालकांचे धाबे दणाणले आहे.