मुंडीपार थरारक हत्याकांड

खुनाचा २४ तासांत छडा: जादूटोण्याच्या संशयातून कामगाराचा काढला काटा

Mundipar Shocking Murder Case: गंगाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंडीपार (एमआयडीसी) परिसरात मंगळवारी (ता.२२) रात्री घडलेल्या थरारक हत्याकांडाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अवघ्या २४ तास

खुनाचा २४ तासांत छडा: जादूटोण्याच्या संशयातून कामगाराचा काढला काटा

Mundipar Shocking Murder Case

 

एलसीबीची कामगिरी : दोन आरोपींना बेड्या, दोन अल्पवयीन ताब्यात

गोंदिया (Mundipar Shocking Murder Case) : गंगाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंडीपार (एमआयडीसी) परिसरात मंगळवारी (ता.२२) रात्री घडलेल्या थरारक हत्याकांडाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत छडा लावला. जादूटोण्याच्या संशयातून आणि जुन्या रागातून हा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी दोन मुख्य आरोपींसह दोन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेतले आहे. जितेंद्र कोहळे (४५) आणि कमलेश अशोक नेवारे (१९) दोघे रा.टॉवरटोली, मुंडीपार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सविस्तर वृत्त असे की, मुंडीपार येथील रहिवासी रविशंकर उदेलाल रहांगडाले (५८) हे २२ सप्टेंबर रोजी रात्री ७.४५ वाजता सुमारास व्यंकटेश राईस मिलमध्ये रात्रपाळीच्या ड्युटीवर जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. दरम्यान, एमआयडीसी रस्त्यावरील चमडा फॅक्ट्रीजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यात गाठून डोक्यावर प्राणघातक वार करत त्यांची निर्घृण हत्या केली होती. याप्रकरणी मृतकाचा मुलगा विक्की रहांगडाले याच्या तक्रारीवरून गंगाझरी पोलिसांत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) अन्वये अज्ञात मारेकर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या पथकाने वेगाने तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे  गावात मृतक रवीशंकर हे जादूटोणा करत असल्याचा संशय आरोपींना होता. या (Mundipar Shocking Murder Case) संशयावरून पोलिसांनी तातडीने कमलेश नेवारे याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

चौकशीदरम्यान कमलेशच्या घरातील दोन व्यक्तींचा झालेला आकस्मिक मृत्यू आणि नातेवाईक वारंवार आजारी पडणे यामागे रवीशंकर यांचाच जादूटोणा असल्याचा संशय आरोपींच्या मनात पक्का झाला होता. याच अंधश्रद्धेतून आणि रागातून कमलेश नेवारे, जितेंद्र कोहळे व इतर दोन अल्पवयीन मुलांनी मिळून रवीशंकर यांचा काटा काढण्याचा कट रचला. ठरल्याप्रमाणे २२ सप्टेंबरच्या रात्री त्यांनी दुचाकीवरून रवीशंकर यांचा पाठलाग केला. चमडा फॅक्ट्रीजवळ त्यांना अडवून हातोडा व कुर्‍हाडीने डोक्यावर सपासप वार करून जागीच ठार केले.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून दोन्ही विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेत पुढील कायदेशीर कारवाईसाठी गंगाझरी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन गुल्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, गंगाझरीचे ठाणेदार सपोनि धीरज राजूरकर, सपोनि अमरदीप खडे, सपोनि जंगमवार, सायबर सेलचे सपोनि देविदास ठमके आणि पोलीस अंमलदारांनी संयुक्तपणे पार पाडली.  पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.