सेलू तालुक्यातील काजळी रोहिणा, राजवाडी गावांना भेट नुकसानग्रस्त शेतकरी, महिलांशी साधला संवाद!
परभणी (Crop Damage) : परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने कहर केला आहे. शेती पिकांसह पडझडीने घरादारांचे मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्री ना. मेघनाताई बोर्डीकर (Guardian Minister Meghnatai Bordikar) यांनी बुधवार २४ सप्टेंबर रोजी सेलू तालुक्यातील काजळी रोहिणा, राजवाडी आदी भागातील नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त महिला, पुरुष शेतकर्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
शेतकर्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन!
सेलू तालुक्यात सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नूकसान झाले. पाऊस सतत सुरु असताना निम्न दूधना प्रकल्पाची पाणी पातळी वाढल्याने दुधना नदीपत्रात पाणी सोडण्यात आले आहे. नदी काठावरील गावामध्ये शेती पिकांचे नुकसान झाले आहे. खरिपाची पिके पाण्याखाली आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवार २४ सप्टेंबर रोजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी प्रत्येक बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली. काजळी रोहिणा व राजवाडी येथील शेतकर्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला. पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर शेत शिवारात येताच महिला आणि शेतकर्यांनी (Farmers) त्यांच्यासमोर आपल्या वेदना मांडल्या. त्यांचे दुःख ऐकुण पालकमंत्री ना. बोर्डीकर यांना देखील भावना अनावर झाल्या. त्या देखील काही वेळ सुन्न झाल्या. शेतकर्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्री ना. मेघनाताई बोर्डीकर यांनी दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार शिवाजी मगर आदींसह प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, भाजपा नेते डॉ. संजय रोडगे, अशोक काकडे, गणेश काटकर, दत्ता कदम, दिनंकर वाघ, भारत इंद्रोके,शिवहरी शेवाळे, बळीराम माने आदींची उपस्थिती होती. यानंतर पालकमंत्री ना. बोर्डीकर जिंतूरच्या दिशेने रवाना झाल्या.