गडचिरोली (Currency Fraud) : एखादी वस्तु खरेदी केल्यानंतर दुकानदारास खोटया नोटा देऊन फसवणुक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असल्याने नागरीकांनी आपणास मिळणार्या नोटा खर्या की खोट्या (Currency Fraud) याची खातरजमा करणे गरजेचे असल्याचे बोलल्या जात आहे.
गडचिरोली येथील एका युवतीने शहरातील ज्युस विक्रेत्याकडून ज्युस खरेदी केल्यानंतर १०० रूपयांची नोट दिल्यानंतर ज्युस विक्रेत्याने तिला २० रूपयांच्या दोन नोटा दिल्या. दरम्यान घरी आल्यानंतर नोटांची पडताळणी केली असता त्या २० रूपयांच्या (Currency Fraud) नोटा लहान मुलांच्या खेळण्यातील असल्याचे निदर्शनास आले.यामुळे सदर युवतीस धक्का बसला. तिला ज्या ज्युस विक्रेत्याकडून या नोटा मिळाल्या, त्या ज्युस विक्रेत्यासही कुणीतरी खोडसाळ व्यक्तीने दिल्या असल्याचे बोलल्या जात आहे.ज्युस विक्रेत्याने ग्राहकाकडून आलेले पैसे गल्ल्यात टाकले. यामुळे नोट खरी की खोटी याची खातरजमा करण्यात आली नाही. आता लग्न सराईचा हंगाम असल्याने वरातील उधळण्यासाठी अशा प्रकारच्या नोटांचा वापर केला जातो. मात्र काही जण अशा नोटा थेट व्यवहारात चालविण्याचा प्रयत्न करीत असल्याने दुकानदारांनी तसेच नागरीकांनीही सावधगिरी बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे.
अन् आजी हिरमुसली
असाच नकली नोटाचा किस्सा काही दिवसापुर्वी राज्य परीवहन महामंडळाच्या गडचिरोली ते अमरावती बसमध्ये बघावयास मिळाला. गडचिरोली ते अमरावती ही बस पहाटेच गडचिरोलीवरून निघते. या बसने नागपूर येथे जाण्यासाठी एक आजीबाई बसमध्ये चढली.ती बसच्या दुसर्या सीटवर बसली. वाहकाने तिकीट काढण्यास प्रारंभ केला असता त्या आजीबाईने थाटात पाचशे रूपयांची नोट (Currency Fraud) वाहकाकडे दिली.मात्र वाहकाने ती नोट पडताळून नकली असल्याचे सांगितल्याने आजीचा चेहरा हिरमुसला. आजीचे वय लक्षात घेता अन्य प्रवाशांनी व वाहकानेही समजुतीचे धोरण घेऊन आजीच्या समक्ष ती नोट फाडून टाकली. आपणास ही नोट कुणीतरी दिल्याचे आजीने सांगितले. यामुळे आपले ५०० रूपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्याने आजीचा चेहरा हिरमुसला होता.




