परभणी (Parbhani):- अल्पवयीन मुलीचा मोबाईलमध्ये घेतलेल्या फोटोसोबत स्वत:चा फोटो मिक्स करुन समाज माध्यमावर व्हायरल करुन बदनामी केल्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला २ वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
बामणी पोलीस ठाणे हद्दीतील प्रकरण
सदर खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर तालुक्यातील बामणी पोलिस ठाण्यात (Police stations) रवि वसंत वटाणे याच्या विरुध्द पिडित अल्पवयीन मुलीने तक्रार दिली होती. आरोपी रवि वटाणे याने पिडिता कामानिमित्त घराबाहेर पडली असता तिचे मोबाईलमध्ये (mobile) फोटो काढले. तिच्या फोटोसोबत स्वत:चा फोटो जोडून तो फेसबुकवर(Facebook) टाकला. पिडिता व आरोपीचे प्रेमप्रकरण सुरु आहे, असे समजून कुणीही तिच्याशी लग्न करु नये, माझ्यासोबत लग्न लावून दिले नाही तर जीवाचे बरेवाईट करील असा मजकुरही लिहून बदनामी केल्याचे तक्रारीत नमुद केले होते. या प्रकरणी आरोपी रवि वटाणे याच्या विरुध्द बामणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोउपनि. हनुमंत नागरगोजे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सदर प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती यु.एम. नंदेश्वर यांच्या कक्षात सुनावणीसाठी आले.
सरकार पक्षात तर्फे अॅड. ज्ञानोबा दराडे यांनी काम पाहिले. या खटल्यात एकुण ८ साक्षीदार तपासण्यात आले.दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकुण न्या. श्रीमती यु.एम. नंदेश्वर यांनी आरोपी रवि वटाणे यास कलम पोक्सो (POCSO) अन्वये २ वर्ष सश्रम कारावास, ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सदर खटल्यात पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी सपोनि.संतोष सानप, पोउपनि.सुरेश चव्हाण, पोअं. प्रमोद सुर्यवंशी, मपोह वंदना आदोडे, पोह स.रहिम यांनी काम पाहिले.