ऑस्ट्रेलियातील मॅक्वेरी युनिव्हर्सिटीचा अनोखा प्रयोग
ऑस्ट्रेलिया (AI Teachers) : शिक्षण क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर झपाट्याने वाढत असताना, ऑस्ट्रेलियातील मॅक्वेरी युनिव्हर्सिटीने शिक्षणपद्धतीत एक अनोखा प्रयोग सुरू केला आहे. विद्यापीठातील मानसशास्त्राच्या दोन अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आणि त्यांच्याकडून विविध परिस्थितींचा सराव करून घेण्यासाठी मानवी ट्यूटरऐवजी AI आधारित ‘व्हर्च्युअल पीअर’ प्रणालीचा वापर केला जात आहे.
वर्गात AI ची एंट्री
मॅक्वेरी युनिव्हर्सिटीने मानसशास्त्राच्या दोन युनिट्समधील साप्ताहिक शिक्षणात (AI Teachers System) ‘व्हर्च्युअल पीअर’ या AI चॅटबॉटचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना केवळ उत्तरे देणे एवढीच त्याची भूमिका नाही. हा AI विद्यार्थ्यांशी संवाद साधतो, त्यांना प्रश्न विचारतो आणि विविध परिस्थितींवर आधारित सराव करून घेतो. त्यामुळे पारंपरिक लेक्चरऐवजी विद्यार्थ्यांचा संवाद, सहभाग आणि प्रत्यक्ष सरावावर आधारित शिक्षण होण्यास मदत होत आहे.
प्रोफेसरच्या जागी AI काय करणार?
यापूर्वी अशा प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसोबत शिक्षक किंवा ट्यूटर उपस्थित असायचे. मात्र, या प्रयोगात AI चॅटबॉट त्या भूमिकेतील काही जबाबदाऱ्या पार पाडत आहे. विद्यार्थी एखाद्या परिस्थितीवर आपली प्रतिक्रिया देतात. त्यानंतर AI त्यांना पुढील प्रश्न विचारतो किंवा योग्य दिशेने विचार करण्यासाठी संकेत देतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजून घेण्यासोबतच निर्णय घेण्याचा आणि परिस्थितीनुसार प्रतिक्रिया देण्याचा सराव करता येतो. मात्र, हा प्रयोग सध्या पूर्णपणे मानवी शिक्षकांचा पर्याय म्हणून केला जात नसून, शिक्षणाची नवी पद्धत म्हणून त्याची चाचणी घेतली जात आहे.
ऑनलाइन क्विझ आणि डिजिटल कंटेंटचाही वापर
AI चॅटबॉटसोबतच (AI Teachers System) विद्यार्थ्यांच्या शिक्षणात ऑनलाइन क्विझ आणि डिजिटल कंटेंटचाही समावेश करण्यात आला आहे. क्विझच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विषय कितपत समजला आहे, हे तपासले जाते. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त मार्गदर्शनाची गरज आहे, त्यांच्यासाठी ऑनलाइन ट्यूटोरियलची सुविधाही उपलब्ध आहे. म्हणजेच AI, डिजिटल चाचण्या आणि मानवी मार्गदर्शन अशा तीन स्तरांवर आधारित शिक्षण मॉडेल येथे वापरले जात आहे.
भविष्यात शिक्षणपद्धती बदलणार?
मॅक्वेरी युनिव्हर्सिटीचा हा (AI Teachers System) प्रयोग शिक्षण क्षेत्रात AI ची भूमिका भविष्यात आणखी वाढण्याचे संकेत देतो. विद्यार्थ्यांना अभ्यास, सराव आणि चुका सुधारण्यासाठी AI आधारित साधने अधिक प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र, यामुळे प्रोफेसर किंवा शिक्षक पूर्णपणे नाहीसे होतील, असे नाही. उलट, नियमित आणि संवादात्मक शिक्षणात AI मदत करेल, तर शिक्षक विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन, वैयक्तिक मदत आणि विषयाची व्यापक समज देण्यावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात.