ढाका (Bangladesh Wildlife Species) : बांगलादेशातील गेल्या काही शतकांमध्ये किमान 31 वन्यजीव प्रजाती नामशेष झाल्याची धक्कादायक माहिती पर्यावरण, वन आणि हवामान बदलमंत्री अब्दुल अव्वल मिंटू यांनी रविवारी संसदेत दिली. शिकार, जंगलतोड, शहरीकरण आणि हवामान बदल ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संसदेतील प्रश्नोत्तराच्या सत्रात कुमिल्ला-9चे खासदार मोहम्मद अबुल कलाम यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना मिंटू यांनी सांगितले की, (Bangladesh Wildlife Species) नामशेष झालेल्या प्रजातींमध्ये 11 सस्तन प्राणी, 19 पक्षी आणि एका सरपटणाऱ्या प्राण्याचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाने (आययूसीएन) 2015 मध्ये केलेल्या मूल्यांकनात या प्रजातींची नोंद करण्यात आली होती. 2015 नंतर आता सरकारने 2026 मध्ये देशाची वन्यजीव ‘रेड लिस्ट’ अद्ययावत करण्यास सुरुवात केली आहे. नव्या मूल्यांकनातून विविध प्रजातींची सद्यस्थिती आणि त्यांच्यावरील धोक्याची पातळी स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
2015च्या रेड लिस्टमध्ये बांगलादेशातील 1619 वन्यजीव प्रजातींची नोंद होती. त्यात 49 उभयचर, 167 सरपटणारे प्राणी, 566 पक्षी, 138 सस्तन प्राणी, 253 गोड्या पाण्यातील मासे, 141 कवचधारी प्राणी आणि 305 फुलपाखरांच्या प्रजातींचा समावेश होता. वन्यजीव संवर्धन अधिक प्रभावी करण्यासाठी सरकारने यंदा वन्यजीव आयोगाची स्थापना केली आहे. वन्यजीव गुन्हे नियंत्रण युनिटकडून अवैध तस्करी आणि वन्यजीव गुन्ह्यांना आळा घालण्याचे काम सुरू आहे.
वाघ, आशियाई हत्ती आणि गंगा डॉल्फिन यांच्या संवर्धनासाठीही दीर्घकालीन उपाययोजना राबविल्या जात आहेत. अत्यंत धोक्यात असलेल्या गिधाडांच्या संरक्षणासाठी सुंदरबन आणि सिल्हेट प्रदेशात दोन गिधाड-सुरक्षित क्षेत्रे घोषित करण्यात आली आहेत. त्यांचे एकत्रित क्षेत्रफळ 47,380 चौरस किलोमीटर आहे. याशिवाय (Bangladesh Wildlife Species) शेरपूर, कॉक्स बाजार, रंगमती आणि राजशाही येथे चार नवीन वन्यजीव व्यवस्थापन व निसर्ग संवर्धन विभाग स्थापन करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.