स्मृती मंधानाकडे कर्णधारपद सोपवण्याची शक्यता
नवी दिल्ली (Harmanpreet Kaur's captaincy) : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नेतृत्वातील एका महत्त्वपूर्ण पर्वाचा अंत झाला आहे. अनुभवी क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरने भारतीय महिला संघाच्या तीनही फॉरमॅटमधील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 37 वर्षीय हरमनप्रीतने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या निर्णयाची माहिती दिली. आपल्या कर्णधारपदाच्या प्रवासाला उजाळा देताना हरमनप्रीतने हा निर्णय घेणे सोपे नव्हते, असे म्हटले आहे. या प्रवासात अनेक वर्षांच्या आठवणी, भावना, त्याग आणि अविस्मरणीय क्षण जोडलेले आहेत. हे सर्व क्षण ती आयुष्यभर जपून ठेवणार असल्याचे तिने सांगितले.
कर्णधार म्हणून 211 सामन्यांत नेतृत्व
हरमनप्रीतने कर्णधार (Harmanpreet Kaur's captaincy) म्हणून भारतीय संघाचे तब्बल २११ सामन्यांत नेतृत्व केले. तिच्या नेतृत्वाखाली भारताने 2025 मध्ये विश्वचषक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. याशिवाय 2012, 2016 आणि 2022 मध्ये भारताने आशिया कप जिंकला. 2022 आणि 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्येही भारतीय महिला संघाने हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली सुवर्णपदक पटकावले. तसेच 2022 च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने रौप्यपदक मिळवले.
हरमनप्रीतच्या (Harmanpreet Kaur's captaincy) नेतृत्वाखाली भारतीय संघाने 1999 नंतर प्रथमच इंग्लंडविरुद्ध द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकण्याची कामगिरी केली. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही तिच्या नावावर विशेष विक्रम आहे. तिने भारताचे 155 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत नेतृत्व केले असून, या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक सामन्यांत कर्णधारपद भूषविण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे.
आता टीम इंडियाची नवी कर्णधार कोण?
कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाबाबत (Harmanpreet Kaur's captaincy) हरमनप्रीतने भारतीय संघ योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचे म्हटले आहे. संघात प्रतिभा, आत्मविश्वास आणि भविष्यासाठी मोठी क्षमता असल्याचेही तिने नमूद केले. “कर्णधार म्हणून माझी जबाबदारी मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडली. आता माझ्या प्रवासाचे पुढचे पान सुरू करण्याची वेळ आली आहे,” अशा भावना हरमनप्रीतने व्यक्त केल्या.
हरमनप्रीतच्या निर्णयानंतर आता भारतीय महिला संघाचा नवा कर्णधार कोण असेल, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. तिच्यानंतर (Smriti Mandhana) स्मृती मंधानाला तीनही फॉरमॅटमध्ये भारतीय महिला संघाची नेतृत्वाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.