२१ दिवसांच्या उपोषणानंतर प्रकृती खालावल्याने सफदरजंग रुग्णालयात दाखल; उपचार सुरू असतानाही उपोषण कायम ठेवण्याची भूमिका
दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरू असतानाही त्यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला असून, रुग्णालयातून जारी केलेल्या पहिल्या संदेशात त्यांनी २० जुलै रोजी होणाऱ्या 'चला संसदेवर' मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनाला त्यांनी "भारताची दुसरी स्वातंत्र्य चळवळ" असे संबोधले आहे.
Message from Sonam :
— Sonam Wangchuk (@Wangchuk66) July 19, 2026
20th JULY
आज़ादी का दूसरा आन्दोलन
भय मुक्त भारत, अन्याय मुक्त भारत
Freedom from injustice (Like paper leaks)
Freedom from Fear (my illegal detention)
India’s 2nd FREEDOM MOVEMENT
March to the Parliament
Please make it a big success
Sent through… pic.twitter.com/XYeUXgUxJH
सोनम वांगचुक हे २८ जूनपासून दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आमरण उपोषण करत आहेत. सलग २१ दिवसांच्या उपोषणामुळे त्यांची तब्येत बिघडल्याचे लक्षात आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी शनिवारी सकाळी त्यांना जंतर मंतरवरून थेट सफदरजंग रुग्णालयात हलवले. रुग्णालयात डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
डॉक्टरांनी आरोग्याच्या दृष्टीने उपोषण थांबविण्याचा सल्ला दिला असला तरी वांगचुक यांनी त्यास नकार दिला आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही त्यांनी उपोषण सुरूच ठेवण्याची भूमिका कायम ठेवली आहे.
रुग्णालयातून पाठवलेल्या संदेशात वांगचुक यांनी २० जुलै रोजी होणाऱ्या 'चला संसदेवर' मोर्चाचा विशेष उल्लेख केला. इन्स्टाग्रामवरील पोस्टद्वारे त्यांनी या आंदोलनाला भारताच्या दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची उपमा दिली. कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्याचे आवाहन केले असून, त्या पार्श्वभूमीवर वांगचुक यांनी आपल्या समर्थकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
रविवारी सकाळी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरही पोस्ट करत "२० जुलै ही दुसरी स्वातंत्र्य चळवळ, भीतीमुक्त भारत आणि अन्यायमुक्त भारत" असा संदेश दिला. त्यांनी पुढे लिहिले की, पेपरफुटीसारख्या अन्यायातून मुक्ती आणि स्वतःच्या कथित बेकायदेशीर अटकेच्या भीतीतून मुक्ती हे या आंदोलनाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच संसदेवर होणारा मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज आणि सफदरजंग रुग्णालयाने रविवारी सोनम वांगचुक यांचे आरोग्य बुलेटिन जाहीर केले. त्यामध्ये त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून सातत्याने देखरेख ठेवली जात असून आवश्यक उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.