हरमनप्रीत कौरने सोडले कर्णधारपद; मात्र संघातील स्थान कायम
नवी दिल्ली (Smriti Mandhana) : भारतीय महिला क्रिकेट संघाला नवी कर्णधार मिळाली असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्मृती मंधानाची सर्व प्रकारच्या क्रिकेटसाठी कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर मंधानाच्या हाती भारतीय संघाची धुरा सोपविण्यात आली आहे.
स्मृती मंधाना (Smriti Mandhana) 2013 पासून भारतीय संघाचा भाग आहे. तिला नेतृत्वाचा चांगला अनुभव असून, तिने यापूर्वी 22 पांढऱ्या चेंडूच्या सामन्यांत भारताचे नेतृत्व केले आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 2024 आणि 2026मध्ये विजेतेपद मिळवून देण्यातही मंधानाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
टी-20मध्ये 18 पैकी 11 सामन्यांत विजय
मंधानाने (Smriti Mandhana) भारतासाठी 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत कर्णधारपद भूषविले असून, त्यापैकी 11 सामन्यांत भारताने विजय मिळवला. सहा सामन्यांत पराभव झाला, तर एक सामना अनिर्णित राहिला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिचा विक्रम आणखी प्रभावी आहे. भारताचे चार एकदिवसीय सामन्यांत नेतृत्व करताना तिने चारही सामन्यांत संघाला विजय मिळवून दिला आहे. डब्ल्यूपीएलमध्ये मंधानाने आरसीबीचे 35 सामन्यांत नेतृत्व केले असून, त्यापैकी 18 सामन्यांत संघाला विजय मिळाला, तर 17 सामन्यांत पराभव झाला.
‘ही जबाबदारी माझ्यासाठी विशेष सन्मान’
नवी जबाबदारी मिळाल्यानंतर (Smriti Mandhana) मंधानाने माजी कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) योगदानाचे कौतुक केले. (Harmanpreet Kaur) हरमनप्रीतने अनेक वर्षे पूर्ण समर्पणाने भारतीय संघाचे नेतृत्व केले असून, ती भारतीय महिला क्रिकेटच्या प्रवासाचा महत्त्वाचा भाग राहिली आहे, असे मंधानाने म्हटले. भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे हा आपल्यासाठी अत्यंत विशेष सन्मान असल्याचे सांगत, संघासोबत काम करताना नवनवीन गोष्टी शिकून भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आपले सर्वोत्तम योगदान देण्याचे आश्वासन मंधानाने दिले.
हरमनप्रीत संघातून बाहेर नाही
कर्णधारपद गमावले असले तरी हरमनप्रीत कौरला संघातून वगळण्यात आलेले नाही. झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी टी-20 आणि एकदिवसीय मालिकांसाठी तिची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. टी-20 संघात शैफाली वर्माकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, तर एकदिवसीय संघाची उपकर्णधार म्हणून दीप्ती शर्माची (Deepti Sharma) निवड करण्यात आली आहे.