केस कचरा नाही 'ब्लॅक गोल्ड'
वर्धा (International Hair Market) : गावखेड्यांपासून शहरी भागातही केसावर भांडी, विकण्याच्या आवाज हमखास ऐकायला मिळतो. पूर्वी केसावर फूगे, केसावर फणी, कंगवा, असा आवाज ऐकू यायचा. पण कोणालाही नवल वाटावे, अशी मानवी केसांची उलाढाल चक्क आंतरराष्ट्रीय बाजारात भाव खाऊन जात असून ही उलाढाल तब्बल 25 हजार कोटींवर पोहोचल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे याला आता ब्लॅक गोल्ड नावानेही ओळखले जायला लागले आहे.
या (International Hair Market) केसांचा वापर अनेक उद्योगातही केला जातो. कचरा समजल्या जाणार्या या केसांचा बाजारात भाव चार हजार रुपयांवर पोहोचला आहे. सलूनमध्ये पुरुषांच्या वेस्ट केसांनाही मागणी आहे. पूर्वी या केसांचा भाव 1500 रुपये किलोच्या आसपास होता. पण तो आता 4 हजार रुपये किलोवर पोहोचल्याने हे सलूनमधील केस हमखास लहान पोत्यात भरून विकले जातात. त्यातून दोन पैसे मिळतात. पुढारलेल्या विज्ञानात मानवी केसांचे इतरही उपयोग समोर आले आहे. माणसांच्या केसांत केरोटीन नावाचे समृद्ध प्रोटिन असते. त्याशिवाय मानवी केसांपासून वैज्ञानिक प्रक्रियेद्वारे उत्कृष्ट सेंद्रिय खत तयार केले जात असून त्याचा उपयोग सेंद्रिय शेतीत होतो, हे सिद्ध झाले आहे.
मानवी केसाच्या जागतिक बाजारपेठेची माहिती घेता, ही उलाढाल तब्बल 25 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताचा वाटा मोठा असून भारतीय मंदिरात होणार्या केसदानामुळे भारताचा वाटा वाढला आहे. त्यातून भारताला परकीय चलन मिळते. चित्रपट सृष्टी, फॅशन इंडस्ट्री तसेच मॉडेलिंग क्षेत्रात टक्कल पडलेल्यांकडून विगची मागणी वाढती आहे.
सिंथेटिक केसांपेक्षा मानवी केसापासून तयार केलेले विग जास्त काळ टिकतात. त्यामुळे ही मागणी वाढती आहे. जागतिक बाजारातही भारतीय केसांच्या गुणवत्तेबाबत सर्वोच्च स्थान आहे. त्यामुळे या केसांना पसंती दिली जाते. महिला सौंदर्यवाढीस हेअर एक्स्टेंशनकरीता गंगावणाचा वापर केला जातो. त्याला मानवी केसाला पसंती दिली जाते. लांब तसेच चांगल्या केसांना याकरीता मागणी असते. त्यामुळे घरोघरी एरव्ही फेकून दिले जाणारे केस साठवून त्यावर गावा गावांत भांडी विकत घेतात. सलूनमध्येही केस फेकून दिले जात नाही.
कचरा समजल्या जाणार्या (International Hair Market) केसांना आता चार हजार रुपये किलोचा दर मिळायला लागला असल्याचे सांगितले जाते. चित्रपट सृष्टीतून मानवी केसांच्या विगला मागणी जास्त आहे. मंदिरामधील दान केलेले केसही साठवून ठेवण्याची काळजी घेतली जाते. एकाच दिशेचे लांब रेमी व्हर्जिन केस केसांच्या एक्स्टेंशनकरीता तसेच वीगकरीता त्यांची नवी बाजारपेठ तयार करीत आहे.