विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व; महायुतीतील जागावाटप, दुष्काळी परिस्थिती आणि शिवसेनेच्या विस्तारावरही चर्चा होण्याची शक्यता
महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीतील हालचालींना वेग आलेला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. दुपारी ४ वाजता शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता असून, या भेटीत राज्यातील रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि आगामी राजकीय रणनीतीवर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.
राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा सध्या प्रलंबित आहे. त्यामुळे शिंदे आणि मोदी यांच्या संभाव्य भेटीत महायुतीतील मंत्रिपदांचे वाटप, नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासह विस्ताराच्या पुढील प्रक्रियेवर विचारविनिमय होऊ शकतो. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा पेचही या चर्चेत उपस्थित होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची कमतरता निर्माण झाली असून, संभाव्य दुष्काळी परिस्थितीचाही मुद्दा शिंदे केंद्रासमोर मांडू शकतात. या परिस्थितीत राज्याला केंद्राकडून आवश्यक मदत मिळावी, याबाबत पंतप्रधान मोदींसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ७ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा रौप्य महोत्सव साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर मोदी एनडीएतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या दिल्ली भेटीलाही राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेरील विस्तार करण्याच्या दृष्टीनेही दिल्लीतील बैठकींना महत्त्व आहे. गेल्या महिन्यात विविध राज्यांतील शिवसेनेच्या प्रदेशप्रमुखांची दिल्लीत बैठक झाली होती. या बैठकीत झालेल्या कामाचा आणि संबंधित राज्यांतील राजकीय स्थितीचा ग्राऊंड रिपोर्ट सादर करण्यासाठी काही प्रदेशप्रमुख आज दिल्लीत एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
राजकीय घडामोडींवर लक्ष
गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये विविध राजकीय आणि संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांच्यात होणाऱ्या संभाव्य भेटीकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या बैठकीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काही निर्णय किंवा संकेत मिळणार का, महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटणार का आणि आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी आघाडीची रणनीती काय असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.