सीबीआय, ईडी चौकशीचे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे आदेश रद्द
नवी दिल्ली (Rahul Gandhi) : बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपांप्रकरणी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या मालमत्तेची पडताळणी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि सक्तवसुली संचालनालयाला (ED) निर्देश देणारे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. तसेच संबंधित याचिकेवर नव्याने सुनावणी घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाला दिले आहेत.
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. कर्नाटकातील भाजप कार्यकर्ते एस. विग्नेश शिशिर यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता असल्याचा आरोप करीत याचिका दाखल केली होती. या आरोपांची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणांना मालमत्तेची पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते.
सुनावणीची संधी न मिळाल्याचा आक्षेप
आपली बाजू ऐकून न घेताच उच्च न्यायालयाने आदेश दिल्याचा आक्षेप राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सर्वोच्च न्यायालयात घेतला होता. याचिकेची ग्राह्यता, याचिकाकर्त्याचा अधिकार आणि संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेवर त्यांच्या वतीने प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
नव्या खंडपीठासमोर सुनावणी होणार
सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे यापूर्वीचे आदेश रद्द करीत नव्या खंडपीठासमोर खुल्या न्यायालयात सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकेच्या ग्राह्यतेसह सर्व मुद्द्यांवर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यासही सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपांवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसून, नव्या सुनावणीत त्यावर विचार केला जाणार आहे.