नालंदा, बिहार (Temple Stampede) बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील शीतला माता मंदिर येथे मंगळवारी (३१ मार्च २०२६) झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत किमान आठ जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिकांच्या मते मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बिहारचे मंत्री विजय कुमार चौधरी यांनी या घटनेत किमान आठ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मंदिर तात्पुरते बंद केले आहे.
भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी मंदिरात एकत्र आले असताना ही दुर्घटना घडली. भक्तांची प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली आणि त्यात अनेक जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून स्थानिक पातळीवर बचावकार्य सुरू केले.
बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील शीतला माता मंदिरात मंगळवारी मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती होती. चैत्र महिन्याचा शेवटचा मंगळवार असल्यामुळे दर्शनासाठी लोक मोठ्या संख्येने आले होते. मात्र, इतक्या गर्दीसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. या गोंधळात झालेल्या चेंगराचेंगरीत आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रांग मोडल्याने गोंधळ उडाला
मिळालेल्या माहितीनुसार, चैत्र महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी दर्शन व पूजेसाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, पोलिस आणि प्रशासनाकडून योग्य नियोजनाचा अभाव होता. दर्शनासाठी घाई होत असताना काही भाविकांनी रांग मोडली आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकमेकांवर ढकलाढकली होऊन परिस्थिती बिघडली.
आठ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
या गोंधळानंतर अचानक धावपळ सुरू झाली आणि चेंगराचेंगरीची घटना घडली. यात काहीजण एकमेकांवर पडल्याने गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि बचावकार्य हाती घेतले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, त्यापैकी आठ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
माहितीनुसार, सहा ते सातपेक्षा अधिक जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या मते, पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडली. विशेषतः चैत्र महिन्यात मोठी गर्दी होत असताना पुरेसा पोलीस बंदोबस्त नसणे हे या घटनेमागील प्रमुख कारण मानले जात आहे.
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नालंदा येथे उपस्थित असल्याची माहिती आहे. त्या नालंदा विद्यापीठातील दीक्षांत समारंभासाठी आल्या आहेत. त्यांच्या कार्यक्रमामुळे पोलिसांचे लक्ष विद्यापीठ परिसरातील सुरक्षा व्यवस्थेकडे वळले असावे, अशीही चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.
स्थानिकांनी मंदिरात गर्दी नियंत्रणासाठी योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप केला आहे. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विधानसभेचे अध्यक्ष प्रेम कुमार यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत पीडितांना सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना ६ लाख रुपयांची अनुदान मदत जाहीर केली आहे (४ लाख राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आणि २ लाख मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून).
नालंदा स्थित माता शीतला मंदिर में भगदड़ की दुखद घटना अत्यंत ही पीड़ादायक है। इस हादसे में जान गंवाने वाले और घायल हुए सभी श्रद्धालुओं के परिवारजनों के प्रति अपनी संवेदनाएँ प्रकट करता हूँ।
— Samrat Choudhary (@samrat4bjp) March 31, 2026
सरकार द्वारा पीड़ित परिवारों को हर संभव सहायता और राहत प्रदान की जा रही है। घायलों के…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत पंतप्रधान सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.दरम्यान, बिहारच्या मुख्य सचिवांना या घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पंतप्रधानांनी 'X' वर पोस्ट केले:
The mishap in Nalanda district, Bihar, is deeply painful. I extend my condolences to those who have lost their loved ones. Prayers for the speedy recovery of those injured.
— PMO India (@PMOIndia) March 31, 2026
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured…