देवरी (Gondia) :- तालुक्यातील देवरी आमगाव रस्त्यावरील मैतेखेडा कडे जाणाऱ्या रस्त्यालगत बोरगांव/डवकी जंगल परिसरात गांजा अमली पदार्थांची वाहतूक करीत असलेल्या व्यक्तीला पकडण्यात गुरूवार (ता.२२मे ) रोजी देवरी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे १ किलो १९० ग्रॅम गांजा पकडला असून त्याची बाजारात १७ हजार ८५० रुपये इतकी किंमत आहे. विनोद पुरणचंद कन्समारे (वय ४२ वर्षे) रा.सावली ता. देवरी असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपीकडून सुमारे १ किलो १९० ग्रॅम गांजा पकडला
गुरुवार (ता.२२ मे ) रोजी पोलीस अधीक्षक गोरख भांमरे गोंदिया, नित्यानंद झा अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी, विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विशेष मोहीम कारवाई दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदर आरोपी हा गांजा (Drugs) वाहतूक करीत आहे, अशा खबरे वरून आरोपी विनोद कन्समारे हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्र. एम. एच. ३५ डी. ३०१४ ने आमगाव ते देवरी रस्त्यावरील मौजा मैतेखेडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक करताना मिळून आल्याने, आरोपीची झडती घेतली असता आरोपीच्या ताब्यातील मोटरसायकलवर लटकविलेल्या थैल्याची झडती घेतली असता पिवळ्या रंगाच्या थैल्यामध्ये १.१९० किलोग्रॅम गांजा अमली पदार्थ किंमत १७ हजार ८५० रुपये व आरोपीच्या ताब्यातील वाहतुकीसाठी वापरलेले मोटार सायकल किंमत ३० हजार रुपये, एक जुना वापरता ओपो कंपनीचा काळया रंगाचा मोबाईल अंदाजे किंमत ५ हजार रुपये असा एकूण ५२ हजार ८५० च्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी विरुद्ध कलम ८ (क), २० (ब), ११(ब) एन डी पी एस अँक्टस अनन्वे गुन्हा नोंद करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्याचा पुढील तपास देवरी चे ठाणेदार यांच्या मार्गदर्शना खाली श्रेणी उपनि. माणिकपुरी पो.स्टे. देवरी हे करीत आहेत. सदर कारवाई कामी सपोनी मुकुंद जाधव, श्रेणी उपनि माणिकपुरी, सापो. हवा. करंजेकर,पोना. पटेल, कांदे, चंदनबटवे, पोना. जांगडे पोसी. मेंढे, डोहाळे, यांच्या सहभाग होता.



 
			 
		

