शासकीय सेवेत सर्वसामान्यांसाठी काम केल्याचा आनंद- दिलीप गावडे
छत्रपती संभाजीनगर (Dilip Gawde) : मराठवाडयात विभागीय आयुक्त म्हणून काम करताना एक दिवस गावकऱ्यांसोबत, सस्ती अदालत, संवाद मराठवाडयाशी असे उपक्रम राबवून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. शासकीय सेवेत विविध पदावरून सर्वसामान्यांसाठी काम केल्याचा आनंद मिळाला अशी भावना विभागीय आयुक्त दिलीप गावडे (Dilip Gawde) यांनी व्यक्त केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून विविध उपक्रम लोकाभिमूख करणारे अधिकारी अशी ओळख असणारे गावडे आज (31 मे) रोजी नियत वयोमानानूसार सेवा निवृत्त होत आहेत.
विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात आयोजित निरोप समारंभात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अपर आयुक्त विजयसिंह देशमुख, डॉ. अनंत गव्हाणे, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, सहआयुक्त (नगर परिषद प्रशासन) देविदास टेकाळे, उप आयुक्त (आस्थापना) सुरेश बेदमुथा, विभागीय आयुक्त गावडे (Dilip Gawde) यांच्या पत्नी मनिषा गावडे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
गावडे (Dilip Gawde) म्हणाले की, शासकीय सेवेत उपजिल्हाधिकारी पदावरून सुरूवात केली असून राज्यातील विविध विभागात 35 वर्ष सेवा केली आहे. सर्वसामान्य माणसासाठी काम करताना समर्मित भावनेने काम केले आहे. पुणे, सांगली, सातारा, अहिल्यानगर तसेच विदर्भातही काम करण्याची संधी मिळाली. सेवानिवृत्त् होताना मराठवाडयात सेवा करण्याची संधी मिळाली, व या सेवेत कामाचा मोठा आनंद मिळाला. विभागातील प्रश्न सोडविण्यासाठी कमी वेळेत ऑनलाईन उपक्रमातून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. सेवेत समवेत काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी तसेच नागरिकांनी सहकार्य केले असल्याचे सांगताना गावडे (Dilip Gawde) यांनी सेवा कालावधीतील प्रसंगानिहाय आपले अनुभव विषद केले. यावेळी विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागनिहाय अधिकारी (Dilip Gawde) यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी अपर आयुक्त सुरेश वेदमुथा यांनाही सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला. वेदमुथा यांनी मराठवाडयात सर्व एकत्रितपणे काम करतात, याचा अनुभव आपल्याला आल्याचे सांगितले. पुणे जिल्हयातील गावडेवाडी सारख्या छोटे गाव ते विभागीय आयुक्त असा आयुक्तांचा प्रवास आमच्यसाठी प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले. प्रास्ताविक अपर आयुक्त परदेशी यांनी केले, त्यांनी गावडे यांच्या सेवाकालावधी व त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.