चार जणांना गमवावे लागले प्राण, सावधगिरीचा ईशारा!
अहेरी (Dog-Snake Bite) : अहेरी तालुक्यात मागील वर्षी ११७ जणांना सापाने तर १०९ जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला. यामध्ये चार जणांना आपले प्राण गमवावे लागले. यामुळे नागरीकांनी साधगिरी बाळगावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अहेरी तालुक्यात पेरमिली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत परिसरात सर्वाधिक १८ नागरिकांना सापाने दंश केला तर आलापल्ली व कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Centre) अंतर्गत गावांमध्ये सर्वात जास्त अनुक्रमे ६२ व ३८ लोकांना कुत्र्याने चावा घेतला. तालुका आरोग्य अहवालानुसार मागील वर्षी सापाने ११७ जणांना दंश केला तर कुत्र्यांनी १०९ नागरिकांना चावा घेतला.
नागरिकांना लक्ष विचलित करून सापाने डंख मारला!
पावसाळ्याच्या दिवसात शेतावर, जंगलात, मजुरांना विविध कामांसाठी घराबाहेर पडावे लागते. नेमक्या याच कालावधीत साप आपल्या बिळातून बाहेर निघून परिसरात वावरत असतात. परिणामी उपजिल्हा रुग्णालयात १५५ साप चावल्याच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. तर पेरमिली परिसरातील शेतकरी व शेतमजूर अशा १८ नागरिकांना सापाने दंश केला. देचलीपेठेत सुद्धा एकाला सापाने आपली शिकार केली. कमलापूर परिसरातील तीन नागरिकांना (Citizens) लक्ष विचलित करून सापाने डंख मारला. अशा एकूण ११७ नागरिकांना सापाचा दंश झाला.
रूग्णास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी न्यावे असे आरोग्य विभागाचे आवाहन!
याच मोसमात कुत्र्यांचा ‘मौसम’ सुद्धा असतो. घराबाहेर कुत्र्यांचे घोळके असल्याचे दिसतात. आलापल्ली व कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील अनुक्रमे ६२ व ३८ नागरिकांचा मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला. पेरमिली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दितही आठ नागरिकांना कुत्र्यांनी जखमी केले. घटना घडल्यानंतर तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन प्राथमिक उपचार घेणे आवश्यक असते. त्यामुळे तातडीने रूग्णास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी न्यावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
तातडीने उपाययोजना करा- आरोग्य विभाग
कुत्रा चावल्यावर स्वच्छ पाण्याने, साबणाने जखम धुवून, पट्टी बांधून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व रेबीज सारख्या गंभीर संक्रमणापासून स्वतःला रोखावे. साप चावल्यावर सुद्धा चावलेल्या व्यक्तीला शांत व स्थिर ठेवावे अन्यथा शरीरात विष लवकर पोहोचते. जखम स्वच्छ करून कापडाने बांधून हृदयाच्या पातळीपेक्षा वरच्या दिशेने उचलून धरणे आवश्यक आहे. यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य विभागाद्वारे कळविण्यात आले आहे.