हिंगोली (Drug Free Campaign) : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त नशामुक्त भारत अभियान समिती अंतर्गत जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती जनजागृतीपर अंमली पदार्थ विरोधी अभियानाचा शुभारंभ समाजकल्याण सहाय्यक आयुक्त तथा प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी गीता गुठ्ठे यांच्या हस्ते हिंगोली येथे करण्यात आला.
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त “एक भारत, व्यसनमुक्त भारत” हा संदेश देत अधिकारी, कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते, व्यसनमुक्ती चळवळीचे कार्यकर्ते आदींनी सहभाग घेतला. एकता, शिस्त, आणि व्यसनमुक्त समाज घडवण्याचा दृढ संकल्प करण्यात आला.
यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदर्शांप्रमाणे समाज एकत्र राहून राष्ट्र निर्मिती आणि व्यसनमुक्तीच्या माध्यमातून आरोग्यदायी व सशक्त भारत निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त तथा प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी गीता गुठ्ठे यांनी केले. नशामुक्त भारत अभियान समितीचे जिल्हा पदाधिकारी तथा नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक विशाल अग्रवाल यांनी व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व अधोरेखित करत युवकांना समाजहितासाठी अंमली पदार्थ विरोधी, तंबाखूमुक्त जीवनशैली, सकारात्मक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच “व्यसनाला नकार-जीवनाला स्वीकार” हा संदेश प्रभावीपणे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त येत्या वर्षभरात जिल्ह्यात व्यसनमुक्ती प्रचार आणि प्रसार करण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांनी सांगितले.
याप्रसंगी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य प्रकाशित तंबाखू-तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत नशाबंदी मंडळाच्या कार्यकर्त्या शुभदा सरोदे, मृण्मयी अग्रवाल यांच्या हस्ते पत्रकाचे वितरण करण्यात आले. तसेच अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.
यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी गीता गुठ्ठे, नशामुक्त भारत अभियान समितीचे जिल्हा पदाधिकारी तथा नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक विशाल अग्रवाल, जिल्हाध्यक्ष शुभदा सरोदे, सहशिक्षक परमानंद शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य प्रकाशित तंबाखू-तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत नशाबंदी मंडळाच्या कार्यकर्त्या शुभदा सरोदे, मृण्मयी अग्रवाल यांच्या हस्ते पत्रकाचे वितरण करण्यात आले. तसेच अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.




