धार्मिक, सांस्कृतिक, समाज प्रबोधनांची रेलचेल
हिंगोली (Durga Mata Festival) : सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके,आंबके गौरी नारायणी नमोस्तुते, आई राजा उदो उदो असा जयघोषात जिल्ह्यातील देवीची मंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. 22 सप्टेंबर सोमवार पासून शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात पारंपरिक पद्धतीने सुरवात झाली. शहराील श्री तुळजाभवानी आणि सातदेवी देवी मंदिरासह इतर देवी मंदिरात भक्तिभावाने घटस्थापना करण्यात आली.
शहरासह परिसरात सकाळपासून घटस्थापनेचा उत्साह सुरू होता, बाजारपेठांत सकाळपासूनच घटस्थापनेसाठी लागणार केळी वावरी, आंब्याचे डहाळे, सप्तधान्य, फूल, हार आदी साहित्य खरेदीसाठी बाजारात झुंबड उडाली होती.
हिंगोली शहरातील जिजामाता नगरातील तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना करण्यात आली त्यानंतर मंदिरात महिला भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती, तसेच शहरातील महात्मा गांधी चौक भागात असलेल्या सातदेवी मंदिर, तसेच चौदादेवी मंदिरात देखील घटस्थापना करण्यात आली.
गोपाललाल मंदिरात सकाळी घटस्थापना करून होमहवन करण्यात आले. त्यानंतर शामशेठ मुंदडा व पुजारी पांडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. शहरात विविध मंडळांनी ढोलताशांच्या गजरात आणि जयघोषात देवी मूर्तीची मिरवणुका काढून गुलालाची उधळण तसेच फटाक्यांची आतषबाजी करत प्रतिष्ठापना करण्यात आली.
गल्लोगल्ली देवीची स्थापना करत दहा दिवस देखीसमोर विविध धार्मिक, सांस्कृतिक व समाजप्रबोधन कार्यक्रमाची रेलचेल असते तसेच प्रत्येक देवीसमोर महाप्रसादाचे कार्यक्रम होतात. शहरातील विशाल दुर्गा मंडल, त्रिशुल दुर्गा मंडळ, आई तुळजाभवानी दुर्गा मंडळ आदी मंडळांनी देवीची मिरवणूक काढून मूर्तीची स्थापना केली.