जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २१ संचालकांसाठी मतदान
तुमसर (District Central Bank) : जिल्हा दुध संघाची निवडणूक होऊन महिना लोटला असलातरी संघाच्या अध्यक्षाची निवडणूक अद्याप झालेली नाही. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा दूध संघातील नवनिर्वाचित संचालक आणि नेतेही व्यस्त आहेत. सहकारातील कायदे तज्ञाचे मते, संचालकांशी चर्चा करूनच ही तारीख काढली जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे (District Central Bank) जिल्हा बँकेच्या अर्थात सहकाराच्या राजकारणाला आता दुधाची आर्थिक उकळी आली असून सहकार्याशिवाय सहकारात उध्दार होणार नसल्याची चर्चा जिल्हाभर रंगू लागली आहे.
विशेष म्हणजे, मला झेडपीचे तिकीट नाही दिले तरी चालेल, पण, (District Central Bank) बँकेचा किंवा दुध संघाचा संचालक करा.?, भंडारा जिल्ह्याच्या राजकारणात अनेकांची ही मागणी. जिल्हा परिषदेची उमेदवारी देऊ शकत नाही, पण दुध संघ वा बँकवर विचार करू, असा शब्द दिला की, बंडखोरी थांबणार आणि जो या सहकाराचा संचालक, तो स्थानिक राजकारणात यशस्वी होणार!
ज्या नेत्यांच्या हातात हा संघ वा बँक, त्याचे जिल्ह्यावर वर्चस्व लोकसभा, विधानसभाच काय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पारडे फिरवण्याची ताकद या बँकेच्या नेत्यामध्ये आहे. एवढे महत्त्व या बँकेचे का? त्याला कारण जिल्ह्याची आर्थिक नाडी म्हणजे जिल्हा बँक व दुसरे या बँकेचे अर्थकारण. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकपदांच्या निवडीसाठी रविवार दि.२७ जुलै रोजी मतदान होणार आहे. जिल्हा बँकेत २१ संचालक असून, एकही संचालक बिनविरोध निवडून आले नाही, हे विशेष.
जिल्हा उपनिबंधकांच्या नियंत्रणात ही निवडणूक प्रक्रिया पूर्णत्वास आणण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने भंडारा शहरात पाच व सात तालुक्याच्या ठिकाणी सात असे एकूण जिल्ह्यात ११ ठिकाणी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदान करता येणार आहे. २१ संचालक पदांसाठी ४६ उमेदवार रिंगणात असून १०६२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनल अशी थेट लढत आहे. सहकार क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असलेले काही उमेदवार शड्डू ठोकून आहेत. त्यामुळे तालुका सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत मतदारांनी काही चमत्कार केल्यास आश्चर्य वाटू नये, अशी जोरदार चर्चा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला रंगली आहे.
दरम्यान, सहकार विभागाने निवडणुकीच्या मतदानासाठी तयारी पूर्ण केली असून आता (District Central Bank) निवडणूक यंत्रणेची अंतीम टप्प्यातील तयारी सुरू झाली आहे. मतदार यादीतील एका मतदाराच्या नावावरून न्यायालयात याचिका दाखल झाल्याने, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही निवडणूक पूर्वनिर्धारीत तारखेला घेण्यास हरकत दाखविली नसली तरी, निकाल मात्र याचिकेवरील निर्णयानंतर जाहीर केला जाणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेसच्या नेतृत्वातील परिवर्तन पॅनल आणि राष्ट्रवादी महायुतीच्या नेतृत्वातील सहकार पॅनलच्या नेत्यांनीही अखेरच्या टप्प्यात कंबर अधिकच कसली आहे. निवडणुकीच्या मैदानात उतरलेले दोन्ही बाजूंचे नेते रात्रीचा दिवस करून मतदारांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त झाले आहेत.
दिग्गजांच्या लढतीकडे लक्ष
दुग्ध संघ गटातून बँकेचे विद्यमान अध्यक्ष सुनील फुंडे विरुध्द खा.प्रशांत पडोळे, मजूर संघ गटातून मजूर संघाचे माजी अध्यक्ष कैलाश नशीने विरुध्द विद्यमान अध्यक्ष भ.सु.खंडाईत, ओबिसी गटातून माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे विरुध्द डॉ.चंद्रकांत निंबार्ते व अपक्ष खा.पडोळे यांचे बंधू विवेक पडोळे, विभज गटातून बँकेचे माजी अध्यक्ष केशवराव हेडावू यांचे चिरंजीव योगेश हेडावू विरुध्द सदाशिव वलथरे व अपक्ष संजय केवट, अनुसूचित जाती गटातून चेतक डोंगरे विरुध्द धनंजय तिरपुडे, नागरी सहकारी गटातून भाजप माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे विरुध्द काँग्रेसचे धनंजय तिरपुडे, मच्छीमार संघ गटातून प्रकाश मालगावे विरुध्द अजय मोहरकर, लाखनी तालुक्यातून धर्मेंद्र बोरकर विरुद्ध काँग्रेसचे अशोक चोले, साकोलीतून पं.स.सदस्य होमराज कापगते विरुद्ध रेखा समरित, पवनी तालुक्यातून जितेश इखार विरुद्ध मोहित मोहोरकर, मोहाडी तालुक्यातील राष्ट्रवादीचे आ.राजू कारेमोरे यांचे बंधू विश्वनाथ कारेमोरे विरुद्ध किरण अतकरी, लाखांदूर तालुक्यातून सदानंद बुरडे विरुद्ध प्रदीप बूराडे, तुमसर तालुक्यातून रामदयाल पारधी विरुद्ध चंपालाल कटरे तर भंडारा तालुक्यातून अनिल सार्वे विरुद्ध दूध संघाचे माजी अध्यक्ष रामलाल चौधरी यांच्यात थेट लढत आहे. महिला राखीव मतदारसंघातून आशा गायधने, तिरा तुमसरे, शीला आगाशे, सविता ब्राह्मणकर, रसिका भुरे यांची उमेदवारी लक्षवेधक ठरत आहे.
मतदारांना देवदर्शनासह लक्ष्मीदर्शनाचे योग
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (District Central Bank) निवडणूक आता फक्त २४ तासांवर आली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच मतदारांची पळवापळवी सुरू झाली असून काही मतदार देवदर्शनाला गेले आहेत तर, काही मतदार उमेदवारांच्या पाहुणचाराचा आनंद घेत आहे. दोन्ही बाजूंकडून मोठ्या प्रमाणावर चुरस वाढल्याने अनेकांचे येथील घडामोडीकडे लक्ष लागले आहे. मतदारांना या काळात लक्ष्मीदर्शनाचे योग आल्याची सहकार क्षेत्रात जोरदार चर्चा आहे.
दिग्गज मंडळी या निवडणुकीत उतरल्याने ही (District Central Bank) निवडणूक चर्चेची झाली आहे. महायुतीचा गट खा.प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात येथे लढत आहे. आ.डॉ.परिणय फुके, आ.राजू कारेमोरे, आ.नरेंद्र भोंडेकर, सुनिल फुंडे या दिग्गजांची साथ येथे आहे. तर काँग्रेस प्रणीत पॅनलची नाना पटोले व खा.प्रशांत पडोळे यांच्यावर मदार आहे. यामुळे लढत नेमकी कशी होईल याचीच चर्चा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रंगली आहे.
सेवा सहकारी सोसायटीच्या मतदारांसाठी पांढरी मतपत्रिका
सेवा सहकारी सोसायटीच्या सात संचालक पदांसाठी निवडणूक होत आहे. सेवा सहकारी सोसायटीच्या मतदारांसाठी पांढर्या रंगाची मतपत्रिका असतील. अनुसुचित जाती/जमाती राखीव मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी फिकट निळ्या रंगाची मतपत्रिका, वि.जा.भ.ज., वि.मा.प्र.राखीव मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी फिकट हिरव्या रंगाची मतपत्रिका, इतर मागासप्रवर्ग राखीव मतदारसंघाच्या पिवळ्या रंगाची मतपत्रिका, महिला राखीव मतदारसंघाच्या गुलाबी रंगाची मतपत्रिका असणार आहे.
जिल्ह्यात ११ मतदान केंद्र
पाच मतदान केंद्र लाल बहादूर शास्त्री विद्यालय, भंडारा, तर सात तालुक्यात जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, मोहाडी, नगर परीषद बांगडकर माध्यमिक शाळा, तुमसर, जिल्हा परीषद गांधी कनिष्ठ महाविद्यालय, लाखनी, जिल्हा परीषद हाय.कनिष्ठ महाविद्यालय, साकोली, नगर पालिका विद्यालय तथा महाविद्यालय, पवनी, जिल्हा परीषद हायस्कुल, क्र.१, लाखांदूर मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.