समुद्रपूर (Soybean Crop) : यंदाच्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीसोबतच सोयाबीन पिकावर आलेल्या विविध रोगांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तावी येथील शेतकरी प्रकाश बलकी यांनी रोगराई व नाशामुळे पूर्णतः नष्ट झालेल्या सोयाबीन पिकाला अखेर स्वतःच्या डोळ्यासमोर आग लावून नष्ट केले.
प्रकाश बलकी यांच्या एकूण पाच एकर शेतजमिनीत त्यांनी अडीच एकरावर कापूस व अडीच एकरावर (Soybean Crop) सोयाबीनची पेरणी केली होती. पिकासाठी त्यांनी उत्तम रासायनिक खते दिली तसेच रोगराई टाळण्यासाठी महागडी कीटकनाशके फवारली. मात्र ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिक पिवळे पडले. त्याच काळात सुरू झालेल्या संततधार पावसामुळे रोग अधिकच वाढला.
रोग ओसरल्यावर शेंगा भरतील, अशी आशा शेतकऱ्याने धरली होती; परंतु पिक पूर्णतः न भरल्याने व मळणीचा खर्चही निघणार नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी शेवटचा हताश निर्णय घेतला. तळहाताच्या फोड्यासारखे जपलेले अडीच एकरातील सोयाबीन पिक प्रकाश बलकी यांनी आगीत जाळून टाकले.
या घटनेत त्यांचे सुमारे ८० हजारांहून अधिक नुकसान झाले आहे. अतिवृष्टी, वाढत्या खर्च आणि रोगराईमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या वेदनेचे हे वास्तव चित्र तावी परिसरात दिसून आले आहे.