ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफीची मागणी!
नांदेड (Farmers Association) : अतिवृष्टी (Heavy Rain) आणि पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आज, दि. १७ ऑक्टोबर रोजी नांदेडमध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. जुना मोंढा येथून सुरू झालेला हा मोर्चा जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
हलगी वाजवत रविकांत तुपकर मोर्चात सहभागी!
शेतकऱ्यांचे प्रश्न आणि व्यथा शासनापर्यंत (Government) पोहोचवण्यासाठी काढण्यात आलेल्या या मोर्चात शेतकरी नेते रविकांत तुपकर हे स्वतः हलगी वाजवत सहभागी झाले होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप आहे, जो या मोर्चातून व्यक्त करण्यात आला.
ओला दुष्काळ जाहीर करा,सरसकट शेतकऱ्यांना शंबर टक्के पीकविमा तात्काळ द्यावा,सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी ५०हजार रुपयाची मदत द्यावी, पुरामुळे जमिनी खरडुन गेलेल्या शेतकऱ्यांना एकरी ३ लाख रुपयाची मदत द्यावी,सरसकट शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी,वाहुन गेलेल्या गुराढोरांना बाजारभावा प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे १५ रूपये कपात करण्याचा शासन निर्णय मागे घ्यावा अशी मागणी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शासनाने संवेदनशीलपणे तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी!
यावेळी बोलताना रविकांत तुपकर यांनी शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य करून त्यांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात झालेले नुकसान लक्षात घेता शासनाने संवेदनशीलपणे तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे. या मोर्चात लक्ष्मण गोरे, बाळासाहेब जाधव, पांडुरंग शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.