ड्रोन खरेदीसाठी कृषी विभागाकडून मिळणार अनुदान
गडचिरोली (Drone pick spraying) : शेतीत नवतंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादकता वाढविणे आणि ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे या दुहेरी उद्देशाने जिल्हा परिषद गडचिरोलीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारच्या ‘नमो ड्रोन दीदी’ योजनेच्या धर्तीवर तसेच राज्य कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण उप-अभियानांतर्गत जिल्ह्यातील महिला बचत गट, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेतीसाठी ड्रोन खरेदीकरिता आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे.यामुळे यापुढे शेतकरी (Drone pick spraying) ड्रोनच्या माध्यमातून शेतात फवारणी करतांना दिसुन येणार आहेत.
महिला बचत गटांना ड्रोन तंत्रज्ञानाने सुसज्ज करून त्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळवून दिला जाणार आहे.यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. ड्रोनचा वापर शेतीत खते विशेषतः नॅनो युरिया/डीएपी आणि (Drone pick spraying) कीटकनाशके फवारणीसाठी करता येईल. यामुळे शेतकर्यांच्या वेळेची आणि खर्चाची बचत होईल.महिला बचत गट आणि शेतकर्यांना भाड्याने ड्रोन सेवा उपलब्ध करून देऊन एक व्यावसायिक मॉडेल तयार करतील.यामुळे त्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल.
ड्रोन खरेदीसाठी किमतीच्या ६५ टक्के पर्यंत किंवा जास्तीत जास्त ५ लाख पर्यंत अनुदान मिळू शकते. अचूक माहितीसाठी जिल्हा परिषद गडचिरोली च्या अधिकृत वेबसाईट पेज वर योजना बद्दल अधिक माहिती व अर्ज करावयाचा नमुना अर्ज प्रसारित करण्यात आला आहे. इच्छुक महिला बचत गट , शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अधिकृत सूचना, मार्गदर्शक तत्त्वे आणि अर्जाची अंतिम मुदत यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी केले आहे.