कर्जमाफीधारकांना तातडीने नवीन कर्ज द्या; पतसंस्थेचा बोजा असला तरी कर्जापासून वंचित ठेवू नका
चिखली (Chikhli Farmers' Crop Loan) : खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर कराव्यात, या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी तसेच लीड बँक व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले. आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात रामनगर येथील शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत हा पाठपुरावा करण्यात आला.
भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष काळे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या पीक कर्जासंदर्भातील विविध समस्या प्रशासनासमोर मांडल्या. कर्जमाफी झालेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्याप नवीन पीक कर्ज मिळालेले नसल्याने त्यांच्यासमोर खरीप हंगामात आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना कोणतीही अनावश्यक अडवणूक न करता तातडीने नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर पतसंस्थेचा बोजा असल्याच्या कारणामुळे त्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. पतसंस्थेचा बोजा असला तरी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या गरजेनुसार पीक कर्जापासून वंचित ठेवू नये, अशी मागणी करण्यात आली. तसेच ज्या बँकेत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे, त्याच बँकेत किंवा शेतकऱ्यांना सोयीच्या जवळच्या शाखेत तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले.

सध्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत बियाणे, खते, औषधोपचार व इतर शेती निविष्ठांसाठी पीक कर्जाची आवश्यकता असताना बँकिंग प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे कर्जवाटप रखडू नये. प्रशासन आणि बँक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन कर्जवाटप प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदन स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी संबंधित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याबाबत आश्वासन दिले. त्यामुळे (Chikhli Farmers' Crop Loan) शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून सकारात्मक पावले उचलली जाण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी जिल्हा सचिव चंद्रकांत बरदे, युवा महामंत्री वैभव लाड, तालुकाध्यक्ष नीरज गायकवाड, दीपक भाकडे, मुकुंदजी देशपांडे, करण बेंडवाल, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश मुठ्ठे, राणा गोपाल गाडेकर, अजय खराटे यांच्यासह रामनगर येथील शेतकरी बाबुराव भगत, सरपंच वैजनाथ शितोळे, प्रकाश भगत, किसनराव डोळस, सुखदेव जाधव, विश्वंभर भगत, शुभम कावरे तसेच पंचक्रोशीतील शेतकरी बांधव उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचा प्रश्न सुटेपर्यंत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्यात येईल, अशी भूमिका यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.