सोयाबीन वाळल्याने बँकेच्या कर्जासह, बियाणे उधारीच्या विवंचनेत घडली घटना
ताडकळस (Parbhani Farmer suicides) : यावर्षी पावसाअभावी खरीप हंगामातील पिके हातची गेली आहेत. जुन महिन्यात शेतकर्यांनी कर्जबाजारी होऊन खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली. परंतु पेरणीसाठी लागलेला खर्च देखील निघणार नसल्याने बँकेचे घेतलेले कर्ज व सोयाबीन पेरणीसाठी उधारी खरेदी केलेल्या बी बियाणे व खताचे पैसे कसे फेडायचे या विवंचनेतून मिरखेल येथील एका अल्पभूधारक शेतकर्याने स्वत: च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार २६ सप्टेंबर रोजी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावर्षी पावसाअभावी भिषण दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. जुन महिन्यात थोडाफार पाऊस झाल्याने शेतकर्यांनी कर्जबाजारी होऊन खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली. परंतु पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीनच्या शेंगा पोकळ झाल्या असून पेरणीसाठी लागलेला खर्च देखील शेतकर्यांच्या पदरात पडत नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात हावालदिल झाला आहे. शासनाने कर्जमाफी जाहीर केली असून अनेक शेतकर्यांची नावे या यादीत आली नाहीत. शनिवार रोजी शासनाने परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाला.
याच रात्री मिरखेल येथील अल्पभूधारक शेतकरी मुकुंद गणपतराव एंगडे वय ६२ वर्षे यांनी त्यांच्या स्वतःच्या बलसा बु शिवारातील गट क्रमांक ५४ या शेतातील लिंबाच्या झाडाला बँकेच्या कर्जासह बियाणाची उधारी फेडायची कशी या विवंचनेतुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार २६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात त्यांचे भाऊ अशोक गणपतराव एंगडे यांनी दिलेल्या खबरीवरुन (Parbhani Farmer suicides) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी सपोउपनि सिध्दार्थ आचार्य, बिट जमादार पांडुरंग पडोळे यांनी धाव घेऊन पंचनामा केला. ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ अभिजित पारवे यांनी मरणोत्तर तपासणी केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.