मानोरा शेतकरी अनुदान

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर अनुदान जमा करा

Manora Farmer Subsidy: शासनाकडून 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' अंतर्गत नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना खात्यात प्रोत्साहनपर लाभ जमा करावा

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर अनुदान जमा करा

Manora Farmer Subsidy

 

शेतकऱ्यांचे तहसीदारमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

मानोरा (Manora Farmer Subsidy) : शासनाकडून 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' अंतर्गत नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना खात्यात प्रोत्साहनपर लाभ जमा करावा, असे निवेदन पोळ्याच्या दिवशी दि. १०  सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. 

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आम्ही सर्व शेतकऱ्यांनी अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करत, प्रसंगी सोने , चांदी गहाण ठेवत व इतर गोष्टींचे कर्ज काढून बँकेचे पीक कर्ज अतिशय प्रामाणिकपणे व वेळेत परतफेड केले आहे. शासनाच्या निकषानुसार आम्ही सर्व अटी पूर्ण केल्या आहेत. परंतु, अत्यंत दुर्दैवी व खेदजनक बाब म्हणजे, दीर्घकाळ लोटूनही मानोरा तालुक्यातील अनेक पात्र नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप प्रोत्साहनपर लाभाची रक्कम जमा झालेली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष, नाराजी व आर्थिक अडचणीचा डोंगर उभा राहिला आहे. यावर्षी पावसाला निराशाजनक झाल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक झालेली आहे. जर सदरहू रक्कम वेळेच्या आत शेतकऱ्यांना मिळाली नाही तर शेतकरी आणखीन कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाही.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्ज परतफेड केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रोत्साहनपर रक्कम विनाविलंब व तात्काळ वर्ग करण्यात यावी, तांत्रिक अडचणी किंवा पोर्टलच्या त्रुटीमुळे रखडलेल्या प्रस्तावांची पडताळणी करून विशेष मोहीम राबवून ते लवकरात लवकर निकाली काढण्यात यावेत,  तालुका स्तरावर पात्र व अपात्र शेतकऱ्यांची पारदर्शक यादी जाहीर करण्यात करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना सद्यस्थितीची माहिती मिळू शकेल.

तरी तहसीलदार महोदयांनी आमच्या या सामूहिक निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा अर्ज त्वरित मुख्यमंत्री महोदयांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवावा आणि मानोरा तालुक्यातील प्रामाणिक शेतकरी बांधवांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  (Manora Farmer Subsidy) निवेदनावर अंजार अहमद खान, अबरार अली खान, राजाराम धेंडे, वासुदेव खोंड, पुंडलिक घोडके आदीसह इतर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टैग्स: Manora Farmer Subsidy