Yawatmal :- मागील दोन ते तिन महिन्यापूर्वी काँग्रेसमध्ये जेष्ठ नेते व दुसर्या फळीतील नेत्यांमधील मतभेद (Disagreement) चव्हाट्यावर आले होते. पक्षातील दोन्ही गटाच्या भावना जाणून घेण्याकरीता समन्वयक म्हणून माजी मंत्री सुनिल केदार यांच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्षांनी जबाबदारी दिली होती. त्यांनी बैठक बोलावून दोन्ही गटाची बाजू ऐकून घेतली होती,मात्र त्यानंतर कुठलाही ठोस निर्णय प्रदेश कार्यकारणीकडून घेण्यात आला नाही.अखेर काँग्रेसच्या दुसर्या फळीतील नेत्यांनी त्यांच्यासाठी सोईची वाट धरायला सुरुवात केली असून आज कॉग्रेसचे (Congress)माजी प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेण्याचे संकेत पत्रकार परिषदेतून दिले.
देवानंद पवार यांचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
जिल्हा कॉग्रेसमध्ये दुसर्या फळीतील मोठा गट जेष्ठ नेत्यांच्या कार्यपध्दतीवर नाराज होता. जेष्ठ नेत्यांमध्येही दुसर्या फळीतील नेत्यांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात होते,त्यांना गद्दार ठरविण्याचा प्रयत्न जेष्ठ नेत्यांकडून केल्या जात असल्याचा आरोप दुसर्या फळीतील नेत्यांनी बैठकीमध्ये केला होता. तर जेष्ठ नेत्यांनीही पक्षात एकतर आम्हाला ठेवा किंवा त्यांनी ठेवा इथपर्यंत वाद विकोपाला गेला होता. समन्वयक माजी मंत्री सुनिल केदार यांनी यवतमाळ जिल्हा काँग्रेसमधील दोन्ही गटातील नाराजी निवळण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आल्याचे दिसून येत नाही. त्याप्रमाणे जेष्ठ नेत्यांच्या कार्यपध्दतीमुळे कुठलीही सुधारणा झाली नसल्याने आपल्या राजकीय अस्तित्वाकरीता सोईची वाट शोधण्यास दुसर्या फळीने सुरुवात केली आहे. आज काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रांतध्यक्षांना आपल्या प्राथमिक सदस्यत्वासह इतर सदस्यत्वाचा राजीनामा पाठविला असल्याचे पत्रकार परिषदेतून (Press conference) स्पष्ट केले.
१३ सप्टेंबर रोजी महसूल मंत्र्यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश
त्यानंतर आपण भाजपमध्ये प्रवेश घेणार असून त्यासाठी स्थानिक व राज्यस्तरावरील नेत्यांच्या गाठीभेटी झाल्या असल्याचे पवार यांनी सांगितले. १३ सप्टेंबर रोजी महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असून मोठ्या संख्येने दुखावलेले काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या सोबत येणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले.