परभणी/सेलू (Parbhani) :- कडब्याच्या गंजीला लागलेल्या आगीत अडीच हजार पेंड्या जळून खाक झाल्या. ही घटना गुरुवार १० एप्रिल रोजी दुपारी ३ च्या सुमारास सेलू तालुक्यातील हातनुर येथे घडली. आगीमध्ये शेतकर्याचे जवळपास ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेतकर्याचे मोठे नुकसान
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील हातनुर येथील महिला शेतकरी तान्हाबाई आप्पाराव सहजराव यांच्या गट क्रमांक ६८ मधील शेत आखाड्यावर असलेल्या कडब्याच्या गंजीला गुरुवारी दुपारी अचानक आग (fire) लागली. आगीत पेंड्या जळून खाक झाल्या. परिसरातील शेतकरी राजु बाबासाहेब सहजराव यांनी आरडाओरड केल्यानंतर बबन पारवे, बळीराम नजान, कृष्णा खोने, बाळू जाधव, हरी कुंभारकर, गवळीआप्पा वालूर, नितीन, गजानन आदी धाऊन आले. त्यांनी विद्युत मोटार व पाईपच्या सहाय्याने पाणी टाकून आग आटोक्यात आणली.



 
			 
		

