भारतीय सैन्याचे पथक लवकरच दाखल होणार!
लातूर (Flood) : जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ आणि अहमदपूर तालुक्यांत पूरपरिस्थितीत अडकलेल्या 10 व्यक्तींची स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक (Disaster Management Team) आणि नागरिकांनी यशस्वीपणे सुटका केली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे (District Collector Varsha Thakur Ghuge) यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कारवाई करत पथकाने ही बचाव कार्ये यशस्वीरीत्या पूर्ण केली. खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय सैन्याचे एक पथक लातूरला पाचारण करण्यात आले असून, हे पथक आज रात्री उशिरापर्यंत अहमदपूर येथे दाखल होईल.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन!
शिरूर अनंतपाळ येथे नदीकाठावरील शेडमध्ये अडकलेल्या पाच व्यक्तींना स्थानिक पथकाने सुखरूप बाहेर काढले. अहमदपूर तालुक्यातील मौजे काळेगाव येथील साठवण तलावाच्या सांडव्यावर अडकलेल्या एका व्यक्तीची तातडीने सुटका करण्यात आली. शिरूर अनंतपाळ येथील घरणी नदीवरील पुलाच्या बांधकामादरम्यान पाण्यात अडकलेल्या तीन मजुरांना स्थानिक पथकाच्या (Local Team) मदतीने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. तसेच, मौजे माकणी येथे गावाजवळील पुलावरून जाताना पाण्यात वाहत गेलेल्या दौलत गोपाळ डोंगरगावे यांना स्थानिक गावकऱ्यांनी वाचवले. त्यांना किरकोळ दुखापती झाल्याने सध्या शिरूर ताजबंद येथील साईकृपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.
लातूर जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर!
लातूर, दि. 28 : जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 60 पैकी 29 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदवली गेली आहे. या पावसामुळे नदी, ओढ्यांची पाणी पातळी वाढून रस्ते, पुलावरून पाणी वाहत असल्याने जवळपास 49 रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली आहे. उद्या, 29 ऑगस्ट 2025 रोजी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या (Students) सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष वर्षा ठाकूर-घुगे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना उद्या, 29 ऑगस्ट 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने दिली.