परभणी (Parbhani):- छतावर सौर ऊर्जा (Solar energy) निर्मिती प्रकल्प बसवुन मोफत वीज मिळविण्याच्या प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेत आता महावितरण तर्फे ग्राहकांना मोफत नेट मीटर देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आपल्या प्रकल्पात किती वीज निर्मिती झाली व घरामध्ये किती वीजेचा वापर झाला. याची अद्ययावत माहिती मोबाईल अॅपवर (Mobile app) मिळेल, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
महावितरण तर्फे मिळणार ग्राहकांना मीटर
महिना ३०० युनिट पर्यंत वीज वापरणार्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे यासाठी प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजना सुरु केली आहे. या अंतर्गत तीन किलो वॅट पर्यंतच्या क्षमतेचे प्रकल्प बसविणार्या ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळते. छतावर वीज निर्मिती केल्यानंतर आवश्यक वीज वापरुन अतिरिक्त वीज विक्री करता येऊ शकते. प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजना फेब्रुवारी २०२४ पासून सुरु झाली. राज्यात ८३ हजार ७४ ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवुन योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांची एकत्रीत क्षमता ३१५ मेघावॅट आहे. केंद्र शासनाकडून संबंधीतांना ६४७ कोटी रुपये अनुदान मंजुर झाले आहे.