किरकोळ कारणावरून घडली घटना; आरोपीला 5 दिवसाची पोलिस कोठडी
हिंगोली (Goregaon Murder case) : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे गुरुवारी किरकोळ कारणावरून १९ वर्षीय तरूणीस चाकूने भोसकून खुन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. (Goregaon Murder case) पोलिसांनी तपासचक्र फिरवून आरोपीला जेरबंद केले. त्याला न्यायालयाने २५ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील संजना गजानन खिल्लारी (१९) ही तरूणी शिक्षण घेत असुन २० फेब्रुवारीला सायंकाळी ४ च्या सुमारास संजना ही घराच्या दुसऱ्या मजल्यावर वाचन करीत बसली होती. याचवेळी तिचा नातेवाईक असलेला अभिषेक संजय खिल्लारी याने तिच्या घरी जाऊन संजना कुठे आहे अशी विचारणा केल्याने कुटूंबीयांनी ती वरच्या मजल्यावर आहे, असे सांगितल्यावर अभिषेक सरळ वरच्या मजल्यावर गेला, यावेळी त्याने संजनाला तु माझी बदनामी का केली अशी विचारणा करून आपल्या सोबत आणलेल्या चाकूने तिच्या छातीजवळ वार करताचा ती घाबरून गेली.
तिने गॅलरीत येऊन आरडा ओरड केली असता अभिषेकने तिच्या कमरेजवळ चाकूचा दुसरा वार केला. संजनाच्या आवाजामुळे कुटूंबीय वरच्या मजल्यावर धाऊन आले असता अभिषेकने पलायन केले. (Goregaon Murder case) जखमी संजनाला गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी तपासुन तिला मृत घोषित केले. या प्रकरणी अशोक खिल्लारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अभिषेक संजय खिल्लारी याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद झळके हे करीत आहेत.
गुन्ह्यातील अभिषेक खिल्लारी याने पलायन केल्याने सपोनि झळके, पोलिस उपनिरीक्षक नितेश लेनगुळे, जमादार अनिल भारती, राहूल मैदकर, विठ्ठल खोकले यांच्या पथकाने तपासचक्र फिरवून २१ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. (Goregaon Murder case) शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता २५ फेब्रुवारीपर्यंत ५ दिवसाची न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.