Gadchiroli :- गडचिरोली जिल्ह्यात जंगली हत्तींच्या हल्ल्यामुळे होत असलेल्या पिकांच्या नुकसानीवर आणि जीवितहानीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन गांभीर्याने प्रयत्नशील आहे. हत्तींचे हालचाली नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना ट्रॅकुलाइज करून वळविण्याची प्रक्रिया राबविण्याबाबत देहरादून येथील वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूटशी संपर्क साधण्यात येणार असल्याची माहिती वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वालयांनी दिली. तसेच हा प्रश्न मुख्यमंत्री यांच्या समक्ष मांडून शास्त्रोक्त उपाययोजना करण्याचा प्रयत्न होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांची माहिती, पिक नुकसानीची केली पाहणी
अॅड. आशिष जयस्वाल यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात जंगली हत्तींमुळे आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आ. डॉ. मिलिंद नरोटे, उपवनसंरक्षक बी. वरूण प्रामुख्याने उपस्थित होते. सहपालकमंत्री जयस्वाल यांनी गडचिरोली तालुक्यातील चुरचुरा, पिपरटोला-धुडेशिवणी, दिभणा या गावांतील हत्तींमुळे झालेल्या पिक नुकसानीची पाहणी केली. ठाणेगाव येथे अतिवृष्टीमुळे (heavy rain) बाधित झालेल्या १२८ हेक्टर क्षेत्राची माहिती घेतली. यावेळी तात्काळ पंचनामे करून भरपाई प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. या पाहणीवेळी उपविभागीय अधिकारी रणजित यादव व अनुष्का शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, तहसीलदार उषा चौधरी, तसेच राकेश बेलसरे, चंद्रशेखर भडांगे व अनेक मान्यवर उपस्थित होते.