कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून जनजागृती!
नांदेड (Gyanoba Tukoba Dindi) : संतांची भूमी असलेल्या मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) रोखण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने संपूर्ण मराठवाड्यात ‘ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी’ काढण्यात येत आहे. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील काकाजी यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी मंगळवारी (१४ ऑक्टोबर) नांदेडमध्ये दाखल झाली होती. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारकरी संप्रदायाच्या वतीने पूरग्रस्त परिस्थितीने हवालदील झालेल्या व तणावग्रस्त शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी आणि शेतकरी आत्महत्या करू नयेत यासाठी कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी!
यावेळी ह.भ.प. विठ्ठल पाटील काकाजी यांनी गावागावात दिंडी काढून शेतकऱ्यांना आधार देणार असल्याची घोषणा केली. ते म्हणाले, “मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ देणार नाही. कीर्तनाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.” नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी ही ‘ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी’ काढण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने आवाहन!
मंगळवारी नांदेडमध्ये आलेल्या या दिंडीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कीर्तन, भजन गाऊन जनजागृती करण्यात आली. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील शेकडो वारकरी बांधवांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी गावागावात जनजागृती करावी, अशी ‘ज्ञानोबा तुकोबांची’ शपथ देण्यात आली. वारकरी साहित्य परिषदेच्या (Varkari Sahitya Parishad) वतीने आवाहन करण्यात आले की, जिल्ह्यातील तणावग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून गावागावात जनजागृती करावी.
मराठवाड्यातील हजारो वारकऱ्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी यासाठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील काकाजी, वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र सचिव डॉ. सदानंद मोरे, वारकरी साहित्य परिषदेचे विश्वस्त व पंढरपूरचे फडकरी यांनी संतभूमी मराठवाड्यात ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी घेऊन फिरत आहेत.
यावेळी वारकरी साहित्य परिषदेचे नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष हभप व्यंकट गुळवे, उत्तर जिल्हाध्यक्ष हभप महाजन जाधव, हभप जिजाताई देशमुख, हभप. अंजीताई मोतेवार, हभप भारतबाई देसाई, हभप जनाबाई खराणे, शुक्राचार्य भीमराव यांच्यासह शेकडो जिल्ह्यातील वारकरी बांधव उपस्थित होते. या दिंडीचे सूत्रसंचालन व आभार बी.आर. पांचाळ यांनी मानले.