लातूर जिल्हा जलमय!
लातूर (Heavy Rain) : लातूर जिल्ह्यात तुफान अतिवृष्टी (Heavy Rain) झाली असून सर्वच धरणे व प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात असून अतिवृष्टीचे पाणी व निसर्गाचे पाणी मिळून नदीपत्रा बाहेर सर्वत्र पाणी पसरल्याने लातूर जिल्हा जलमय झाला आहे. या पावसात जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आल्याने खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला आहे.
लातूर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी रात्री सरासरी 80 मिमी पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत (162.9 मिमी सरासरी) प्रत्यक्षात 336.0 मिमी पाऊस झाला आहे. दि. 1 जूनपासून आतापर्यंतचा पाऊस अपेक्षित पर्जन्यमानाच्या (687.9 मिमी) तुलनेत 894.5 मिमी म्हणजेच 130.0 टक्के इतका पाऊस झालेला आहे. लातूर जिल्ह्याची वार्षिक सरासरी (जून ते सप्टेंबर) 706.00 मिमी च्या तुलनेत आजतागायत 894.5 मिमी म्हणजेच 126.7 टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
सर्वच प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग!
जिल्ह्यातील जवळपास 60 मार्गावरील वाहतूक नद्यांना आलेल्या पुरामुळे बंद झाली आहे. जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, तावरजा, रेणा, तेरू यासह सर्वच प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सर्व धरणे व प्रकल्प 100 टक्के भरल्याने जिल्ह्यात सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे सर्वत्र नद्या, नाले, ओढे भरून वाहत आहेत.
अहमदपूर तालुक्यातील चिलखा येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या चौघांना बचाव पथकाने वाचविले. देवणी तालुक्यातील चवण हिप्परगा येथे जुना बुरुज एका घरावर ढासळला. यात एक जण किरकोळ जखमी झाला आहे. औसा तालुक्यातील वाघोलीत वीज पडून एक महेश ठार झाली. तर चोबळी येथे पुराच्या पाण्यात बैल वाहून गेला.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन!
लातूर शहरातील सखल भागातील शेकडो कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची वेळ प्रशासनावर आली. चाकूर येथे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने जवळपास 20 कुटुंबे सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आली. लातूर तालुक्यातील निवळी येथे मुलाच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्याला आपत्ती व्यवस्थापन पथकाने पुराच्या पाण्यातून वाचविले. उदगीर तालुक्यातील हळी हंडरगुळी येथे एका महिलेला पुराच्या पाण्यातून वाचविण्यात पथकाला यश आले. दरम्यान हवामान खात्याने (Department of Meteorology) मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी अशी आवाहन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले आहे.