शनिवारी निरीक्षकांनी घेतला आढावा
अध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छुक
हिंगोली (Hingoli Congress) : काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांनी गुरूवारी आपल्या पदासहीत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा पक्षाकडे सोपविला. शनिवारी होणार्या आढावा बैठकीच्या आदल्या दिवशी त्यांनी अचानक (Hingoli Congress) राजीनामा दिल्याने पक्षात शिल्लक असलेल्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे.
काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर पक्षाला लागलेली गळती आजपर्यंत सुरूच आहे. यापूर्वी जिल्हाध्यक्ष असलेल्या मुनीर पटेल यांनी प्रकृतिचे कारण पुढे करून राजीनामा दिला होता. त्यावेळी अध्यक्ष पदासाठी मोठी स्पर्धा सुरू होती. या स्पर्धेत प्रज्ञा सातव यांनी बाजी मारली व दिलीप देसाई यांच्या नियुक्तीचे पत्र थेट मुंबईतून काढले होते. देसाई यांच्या नियुक्तीने पक्षात गटबाजी थांबेल अशी सर्वांना अपेक्षा होती. पुढे देसाई यांचा कल माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकरांकडे वाढला. त्यामुळे देसाई – सातव यांच्यातील संवाद संपला.
पुढे गोरेगावकरांनी बंडखोरी करून विधानसभेची निवडणूक लढविली. असे असले तरी त्यांच्यावर पक्षाने कोणतीच कारवाई केली नाही. (Hingoli Congress) त्यामुळे ते अजूनही पक्षात आहेत किंवा नाहीत याचा खुलासा कोणाकडेच नाही. काँग्रेस पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यभर पक्ष बांधणीचा आराखडा तयार केला आहे. यानुसार शनिवारी हिंगोलीत पक्षाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जालना येथील कल्याण दडे हे निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार होते.
या बैठकीच्या आदल्या दिवशी जिल्हाध्यक्षांनी अचानक राजीनामा (Hingoli Congress) दिल्याने पक्षातील वातावरण एकदम बदलले. अनेक नेत्यांनी अध्यक्ष पदासाठी फिल्डींग सुरू केली. आगामी काळात येणार्या जिल्हा परिषद व नगर परिषदांच्या निवडणुका डोळ्या समोर ठेवून अनेकजण पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी पुढे आले आहेत. नवीन अध्यक्ष कोण असावा याबाबत बैठकीत प्रमुख कार्यकर्त्यांनी निरीक्षकांशी खासगीत चर्चा करून नावे सुचविली. या स्पर्धेत अ.हफिज, डॉ. सतिष पाचपुते, विनायक देशमुख, सुरेश सराफ, अनिल नैनवाणी, शंकरराव कर्हाळे आदींची नावे चर्चेत आहेत.
शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत निरीक्षक कल्याण दडे, आ. प्रज्ञा सातव, प्रदेश उपाध्यक्ष सचिन नाईक यांच्यासह अ.हफिज, डॉ. सतिष पाचपुते, विनायक देशमुख, सुरेश सराफ, अनिल नैनवाणी, शंकरराव कर्हाळे, बापुराव बांगर, माबुद बागवान, जुबरे मामू, बंटी नागरे, मिलिंद उबाळे, साद अहेमद, मुजीब कुरेशी, बासिद मौलाना, शेख अलिमोद्दिन, ऋषिकेश देशमुख आदींसह अनेकजण उपस्थित होते.