जिल्हा न्यायाधीश पी.जी. देशमुख यांनी सुनावला निकाल
हिंगोली (Hingoli District Court) : लिंबाळा मक्ता पाटीजवळ बुलेटवरून आलेल्या दोघांनी बस अडवून चालकास मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात अंतिम सुनावणीत जिल्हा न्यायाधीश पी.जी. देशमुख (Judge P.G. Deshmukh) यांनी दोन्ही आरोपींना सहा महिने कारावास व प्रत्येकी २५०० रुपये दंड ठोठावला.
या बाबत अॅड. एन.एस. मुटकुळे यांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोली आगाराचा बस चालक विश्वनाथ माधवराव घुगे हे परभणीहून हिंगोलीकडे प्रवाशी घेवून येत असताना लिंबाळा मक्ता पाटीसमोर बुलेटवरून आलेल्या आरोपींनी बस अडवून चालक विश्वनाथ घुगे यास शिवीगाळ करून थापडाने मारहाण, जिवे मारण्याची धमकी दिल्याने २२ ऑगस्ट २०१९ रोजी (Hingoli District Court) हिंगोली ग्रामीण पोलिसात गोविंदू महादू कर्हाळे, राजेश सुभाष कर्हाळे रा. डिग्रस कर्हाळे या दोघावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास एस.पी. चव्हाण यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
१७ ऑक्टोबरला (Hingoli District Court) जिल्हा न्यायाधीश पी.जी. देशमुख (Judge P.G. Deshmukh) यांनी शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी आरोपी गोविंदू कर्हाळे व राजेश कर्हाळे यांना दोषी ठरवून कलम ३५३ भादवी नुसार सहा महिने कारावास शिक्षा व १ हजार रुपये प्रत्येकी दंड, कलम ३२३ भादवी प्रमाणे सहा महिने कारावासाची शिक्षा व १ हजार रुपये प्रत्येकी दंड, कलम ३४१ भादवीमध्ये प्रत्येकी ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणात सरकार पक्षा तर्फे जिल्हा सरकारी वकिल एस.एन. मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी वकिल एस.डी. कुटे यांनी बाजू मांडली. न्यायालय समक्ष एकूण ६ साक्षीदार तपासले तसेच अंतिम युक्तीवाद केला. त्यांना सहाय्यक सरकारी वकिल श्रीमती एस.एन. देशमुख यांनी सहकार्य केले. या प्रकरणी कोर्ट पैरवी हिंगोली ग्रामीण ठाण्याचे पी. बी. धुर्वे यांनी विशेष सहकार्य केले.