हिंगोली ग्रामीण पोलिसात २० जणांवर गुन्हा दाखल
हिंगोली (Hingoli Mahavitaran) : महावितरणचे प्रधान तंत्रज्ञ हे कर्मचारी २१ मे रोजी लिंबाळा मक्ता भागामध्ये वीजेचा फॉल्ट शोधण्याकरीता गेले असता त्यांची मोटार सायकल अडवून १५ ते २० जणांनी लोखंडी रॉडने मारहाण केल्या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हिंगोली शहराचा पाणी पुरवठा खंडीत झाल्याने सिध्देश्वर धरणापासून होणारा वीज पुरवठा नादुरूस्त झाल्याने त्याचा फॉल्ट शोधण्याकरीता (Hingoli Mahavitaran) महावितरणचे कार्यकारी अभियंता अमोल मोरे, उपकार्यकारी अभियंता ए.एस. पेटकर, निरज रणवीर यांच्यासह काही कर्मचारी मागील ३ ते ४ दिवसापासून शोध मोहिम घेत आहेत. त्यासाठी डिग्रस कर्हाळे येथील जलशुध्दीकरण केंद्रासह परिसरात विजेच्या दुरूस्तीकरीता ये – जा सुरू आहे. २१ मे रोजी महावितणचे प्रधान तंत्रज्ञ सरोजखॉन युसूफखॉन पठाण हे रात्री ११ च्या सुमारास वीज फॉल्ट काढून हिंगोली शहराकडे येत असताना महावितरणच्या अधिकार्यांनी त्यांना लिंबाळा मक्ता २२० के.व्ही. येथे जाण्याकरीता सांगितले.
त्यामुळे पठाण हे रात्री ११. ३० च्या सुमारास मोटार सायकल क्रमांक एमएच ३० बीके. ४७७८ यावरून जात असताना शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या टी पॉईंटवर काही जण गर्दी करून उभे असल्याने पठाण यांनी मोटार सायकल हळूवार पणे घेतली असता अचानक त्यातील काही जणांनी मोटार सायकल आडवी करून खाली पाडल्यानंतर लोखंडी रॉडने व लाथा बुक्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. याच वेळी पठाण यांनी मी महावितरणचा कर्मचारी आहे, मला का मारत आहात, अशी विचारणा करताच तुम्हीच आहेत ना आमची लाईन बंद करणारे असे म्हणुन पुन्हा मारहाण सुरू केली असता रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांचे वाहन तेथे आले. त्यामुळे सदर घटनास्थळावरून दोघांनी मोटार सायकल क्रमांक एमएच ३८ एए ११८८ व एका विना क्रमाकांची मोटार सायकल जागेवर सोडून पलायन केले.
सदर ठिकाणी आलेल्या पोलिसांनी पठाण यांना विचारपुस केल्यानंतर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. यानंतर पठाण यांनी सदर मारहाणीची माहिती (Hingoli Mahavitaran) महावितरणच्या अधिकार्यांना दिल्यानंतर रुग्णालयात पठाण यांच्यावर उपचार करण्यात आला. २२ मे गुरूवार रोजी हिंगोली ग्रामीण पोलिसात पठाण यांनी रितसर तक्रार दिली. ज्यामध्ये अनोळखी १५ ते २० जणांनी त्यांना लोखंडी रॉडने व लाथा बुक्याने मारहाण केल्याचा उल्लेख केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे ह्या करीत आहेत.दरम्यान महावितरणचे कर्मचारी पठाण यांना मारहाण झाली. त्यावेळी पोलिसांचे वाहन पोहचल्याने पुढील अनर्थ टळला. परंतु घटनास्थळी पोलिसांना मिळालेल्या दोन मोटार सायकली यावरून आरोपी निष्पन्न होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.