१५ डिसेंबरच्या अंतिम पैसेवारीकडे सर्वांचे लागले लक्ष
हिंगोली (Hingoli Najar Paisewari) : जिल्ह्याची नजरी पैसेवारी सरासरी ४५.८८ पैसे जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये कळमनुरी तालुक्यातील सर्वात कमी ४३.९६ पैसे वारी आली आहे. त्यामुळे आता अंतिम पैसेवारीकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या वर्षी ३ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी करण्यात आली. ज्यामध्ये प्रामुख्याने हळद, कापुस, सोयाबीन, तुर या प्रमुख पिकांचा समावेश आहे. जून महिन्यामध्ये पिकाची लागवड झाल्यानंतर हंगाम चांगला येईल, अशी अपेक्षा शेतकर्यांना होती; परंतु सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांना चांगलाच फटका बसला. त्यातच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी, नाले व ओढ्यांना पुर आल्यामुळे काठा लगतची पिके जमीनीसह वाहून गेली. (Hingoli Najar Paisewari) सोयाबीनचे हातातोंडाशी आलेले पिक अतिवृष्टीमुळे हिरावून गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला.
त्यामुळे जिल्ह्यातील (Hingoli Najar Paisewari) नजरी पैसेवारी किती येणार याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले होते. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यातील पाचही तालुक्याची नजरी पैसेवारी जाहीर केले. ज्यामध्ये जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ४५.८८ पैसे आली आहे. यामध्ये तालुकानिहाय पैसेवारी पुढील प्रमाणे सेनगाव ४५.४७ पैसे, हिंगोली ४५ पैसे, कळमनुरी ४३.९६ पैसे, वसमत ४८ पैसे आणि औंढा नागनाथ तालुक्याची पैसेवारी ४७ पैसे ऐवढी आली आहे. ही पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आल्याने जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतीपिकांना मोठा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या संदर्भात अहवाल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविला आहे. त्यानंतर आता सुधारीत व अंतिम पैसेवारीकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे. अंतिम पैसेवारी १५ डिसेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे याकडेही शेतकर्यांचे लक्ष केंद्रीत आहे.