जिल्हा पोलिस दलात ६४ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रीया
हिंगोली (Hingoli Police Bharti) : जिल्हा पोलिस दलामध्ये ६४ रिक्त पदांसाठी पोलिस शिपाई भरती प्रक्रीया घेतली जाणार आहे. ही भरती प्रक्रीया पारदर्शकपणे राबविण्यात येणार असुन इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही भूलथापांना व प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले आहे.
जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात ३१ ऑक्टोंबर रोजी (Hingoli Police Bharti) जिल्हा पोलिस दलातील पोलिस शिपाई, चालक पोलिस शिपाई भरती प्रक्रीया २०२४- २५ च्या अनुषंगाने पत्रकार परिषद बोलविण्यात आली होती. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, पोलीस निरीक्षक मरे उपस्थित होते.
यावेळी पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी पुढे सांगितले की, (Hingoli Police Bharti) हिंगोली जिल्हा पोलिस दलात ३७ पोलिस शिपाई व २७ चालक पोलिस शिपाई पदाकरीता भरती प्रक्रीया राबविली जाणार आहे. त्या करीता ३० नोव्हेंबर पर्यंत इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. या भरती प्रक्रीयेकरीता सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी ४५० रुपये व राखीव प्रवर्गासाठी ३५० शुल्क आकारण्यात आले आहे. 
भरती प्रक्रीयेत जास्तीत जास्त अत्याधूनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असुन मैदानी चाचणीत उमेदवारांच्या समक्ष त्यांना मिळालेले गुणदान केले जाणार आहे. भरती प्रक्रीया पारदर्शकपणे राबविण्या करीता संपूर्ण मैदानावर सीसीटीव्ही कॅमेर्यांचा वॉच राहणार आहे. मैदानावर इच्छुक उमेदवारासह प्रत्यक्ष भरतीसाठी नियुक्त केलेल्या पोलिस अधिकार्यासह कर्मचार्यांना प्रवेश दिला जाणार आहे. इतर कोणताही खासगी व्यक्ती आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. 
या (Hingoli Police Bharti) भरती प्रक्रीयेच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचाही वॉच राहणार आहे. भरती प्रक्रीया पूर्णपणे पारदर्शक असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही भूलथापांना अथवा प्रलोभनाला बळी पडू नये, यापूर्वी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रीयेत उमेदवारांनी उत्तेजक इंजेक्शन घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. 
त्यामुळे (Hingoli Police Bharti) भरती प्रक्रीये दरम्यान वारंवार स्वच्छता गृहात जाणार्या उमेदवाराची वैद्यकीय चाचणी देखील केली जाणार आहे. तसेच भरती प्रक्रीयेत कोणीही बनावट उमेदवार देण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा त्याच्या विरूध्द कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे.
