हिंगोलीतील रेल्वे स्थानकात विविध विकास काम जोमात सुरू!
हिंगोली (Hingoli Railway Station) : रेल्वे स्टेशनच्या मुख्य इमारत मार्गावर जिजामाता नगर भागाकडील दिशेने मुख्य दादरा उभारणीचे काम सुरू झाले आहे. रेल्वे स्थानकावर विविध विकास कामे (Development Works) टप्याटप्याने केली जात आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेत हिंगोलीतील रेल्वे स्थानकात विविध विकास काम जोमात सुरू आहेत. हिंगोली स्थानकावरून अनेक पॅसेंजर, एक्सप्रेस मेल व स्पेशल रेल्वेसह मालगाड्या धावत आहेत. स्थानकावरून येणार्या जाणार्या प्रवाशांची दररोज संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या (Passengers) सुविधेसाठी अकोला-पुर्णा बॉडगेज रेल्वे मार्ग तयार करताना प्लॅट फार्म १ व २ ला जोडणारा दादरा तयार करण्यात आला होता.
मुख्य इमारती बाहेर येण्या जाण्याची सुविधा मिळणार!
सध्या रेल्वे स्थानकावर अमुलाग्र बदल घडत असताना ४० फुट रुंदीचा ३ लिफ्ट व दिव्यांगांच्या सुविधेसाठी रॅम्प असलेला नवीन दादरा उभारणीचे काम मागील काही दिवसापासून सुरू होते. नवीन दादर्यासाठी प्लॅट फार्म क्र.२ वरील रेल्वेस्थानकाची इमारत सुध्दा पाडण्यात येत आहे. नवीन दादरा प्लॅटफार्म क्र. १ व २ ला जोडून या दादर्याचा विस्तार प्लॅटफार्म क्र. १ पासुन रेल्वे स्थानकाच्या मुख्य इमारती बाहेर पर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना या दादर्यावरून मुख्य इमारती बाहेर येण्या जाण्याची सुविधा मिळणार आहे. नवीन दादर्यासाठी साडेपाच मीटर उंचीचे ६० कॉलम उभे करण्यात येणार आहेत. त्यापैकी १२ स्टीलचे कॉलम मुख्य इमारतीच्या खुल्या जागेवर उभे करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. नवीन दादरा निर्मितीमुळे प्रवाशांना ये जा करण्याचा मार्ग सुकर होणार आहे.