लातूर (Latur):- एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक झालेल्या लातूर येथील देशिकेंद्र विद्यालयाच्या अनागोंदीत ‘संधी’ साधत लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील शुक्राचार्यांनी देशिकेंद्र विद्यालयाचे अवघे ‘मुसळ’ केरात घातल्याचे वृत्त ‘देशोन्नती’ने(Deshonnati) मंगळवारी (दि.4) दिल्यानंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झाला. या वृत्ताची दखल घेत लातूरचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी बुधवारी (दि.5) याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहीत याप्रकरणी तात्काळ कारवाई करून 13 मार्च 2025 पर्यंत अहवाल सादर करा, असा आदेश दिला आहे.
लातूरच्या शिक्षण उपसंचालकांचे ‘धाडस’; माध्यमिक शिक्षण विभागाला केला सवाल!
संस्थाचालकांच्या परस्पर ‘पावणे पाच’ करण्याचा हा ‘फण्डा’ देशिकेंद्रच्या निवृत्त मुख्याध्यापिकेने एका शिक्षकाला हाताशी धरून व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या संगनमताने केला. नोकर भरतीचे कोणतेही नियम न पाळता बेकायदेशीरपणे भरती केली व बोगस वैयक्तिक मान्यता मिळवत सेवकास वेतनही सुरू केले. त्यामुळे या प्रकरणात सेवानिवृत्त सहाय्यक प्रकल्प अधिकारी विठ्ठल महापुराव भोसले यांनी शिक्षण उपसंचालकांसह सर्व संबंधितांना पत्र देत बोगस वैयक्तिक मान्यता रद्द करावी, अशी मागणी केली होती. दरम्यान याप्रकरणी शिक्षण उपसंचालकांनी बुधवारी (दि.5) लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र काढले आहे. विठ्ठल महापूराव भोसले यांच्या तक्रारीचा संदर्भ देत याप्रकरणी शासनाच्या प्रचलित नियम व धोरणानुसार योग्य ती तात्काळ कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दि.13 मार्च 2025 पर्यंत या कार्यालयास सादर करुन संबंधितास अवगत करावा, असे म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात माध्यमिक शिक्षणाधिकारी कोणते पाऊल उचलतात? हे पाहणे गमतीशीर ठरणार आहे.
बोगस व बेकायदा प्रकार घडताना
संस्थाचालक काय करत होते…?
वास्तविक, लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागानेही एस.के. कल्याणी यांच्या बेकायदा व बोगस पत्रांचा आधार घेत शासनाची फसवणूक (Fraud)करण्यात कसर ठेवली नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी भोसले यांनी केली होती. ‘देशोन्नती’ने याप्रकरणी वृत्त दिल्यानंतर या वृत्ताने लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली. देशिकेंद्र विद्यालयासारख्या एकेकाळी नावलौकिक झालेल्या विद्यालयामध्ये हा बोगस व बेकायदा प्रकार घडत असताना संबंधित शाळेचे संस्थाचालक काय करत होते? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.




