गावातील लोकवस्तीतून होते वाहतूक; ग्रामस्थांच्या जीवितास धोका
तुमसर (Illegal Sand Extraction) : तालुक्यातील कवलेवाडा रेती घाटावर सध्या अवैध रेती उपशाचे सत्र सुरू असून, दिवसेंदिवस रेती माफियांचा धाडस वाढत चालले आहे. गावातूनच ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक केली जात असून, यामुळे ग्रामस्थांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या कवलेवाडा रेती घाटातून रोज रात्री तसेच सकाळच्या वेळी (Illegal Sand Extraction) रेतीचे ट्रॅक्टर गावाच्या मध्यवस्तीमधून वेगाने धावत असतात. लहान मुलं, वृद्ध आणि शाळेत जाणारे विद्यार्थी यांच्यावर अपघाताचा धोका सतत निर्माण झाला आहे. या बेकायदेशीर वाहतुकीमुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, धूळ आणि आवाजामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
याबाबत नागरिकांनी अनेक वेळा संबंधित अधिकार्यांकडे तक्रार केली असली तरी, स्थानिक सरपंच, पोलिस पाटील तसेच पोलिस व महसूल प्रशासन यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. उलटपक्षी, गावात चर्चा आहे की, हे अधिकारी रेती तस्करांकडून आर्थिक लाभ घेऊन मौन बाळगतात. त्यामुळे गावकर्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकीकडे शासन पर्यावरण रक्षणासाठी मोहिमा राबवित असतांना, दुसरीकडे कवलेवाडा परिसरात उघडपणे सुरू असलेल्या या (Illegal Sand Extraction) अवैध उपशामुळे नदीपात्राचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याचा परिणाम स्थानिक भूजलस्तरावरही होण्याची शक्यता आहे.
गावकर्यांची मागणी आणि आंदोलनाचा इशारा
महसूल प्रशासन आणि पोलीस विभाग यांनी तातडीने रेती उपसा थांबवावा, संबंधित ट्रॅक्टर जप्त करावेत आणि या (Illegal Sand Extraction) तस्करीमागील प्रमुख माफियांवर कठोर कारवाई करावी. जर या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले गेले, तर कवलेवाडा ग्रामवाशीयांकडून पोलिस स्टेशन समोर मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.