परभणी(Parbahni):- मुंबईला जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये(Janshatabdi Express) टीटीई प्रवाशांकडून दंडाच्या नावाखाली जोरदार लूट करत आहेत. तिकिटाची पावती न देता 100-200 रुपये प्रत्येक प्रवाशांकडून घेत टीटीई (TTE) स्वतःचा खिसा भरण्याचे काम करत आहेत.
मार्च महिन्यामध्ये जनशताब्दी एक्सप्रेसचा विस्तार करण्यात आला. त्यानुसार जालन्यावरून जाणारी जनशताब्दी हिंगोली वरून सुरू करण्यात आली. त्यामुळे हिंगोली, पूर्णा, परभणीच्या प्रवाशांना संभाजीनगर, मनमाड, नाशिक आणि मुंबई साठी प्रवास करणे सोपे झाले आहे. जनशताब्दी एक्सप्रेसला (गाडी क्र. 12072) जनरल डबा नसल्यामुळे तिकीट आरक्षित नसल्यास प्रवास करता येत नाही. परंतु काही प्रवासी महत्त्वाच्या कामामुळे जनरल तिकीट काढून प्रवास करत आहेत. त्यांची तपासणी टीटीई म्हणजे ट्रॅव्हलिंग तिकीट चेकर (Ticket checker) कडून गाडीमध्ये केली जाते. त्यावेळी प्रवाशांकडून दंडाची रक्कम घेण्याऐवजी 100-200 रुपये घेतले जात आहेत.
प्रवाशांकडून पूर्ण पैसे भरून दंडाच्या पावतीची मागणी केल्यानंतरही संबंधित टीटीई पावती देत नाहीत. मनमाड नंतर टीटीई ची बदली होत असल्याने जोरदार पैशाची लूट करण्यात येत आहे. देशोन्नतीने (Deshonnati)केलेल्या ऑपरेशन मध्ये हे आढळून आले. परभणी रेल्वे स्थानकावर आरक्षित तिकिटाच्या रकमेमध्ये करंट बुकिंग तिकीट खिडकी सुरू करण्याची मागणी प्रवाशां करत आहेत. मात्र याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. करंट बुकिंग खिडकीमुळे रेल्वेच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. परंतु सध्यातरी जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये ड्युटीवर असलेल्या टीटीईंच्या उत्पन्नात भरघोस वाढ होत आहे. याकडे रेल्वे प्रशासन लक्ष देणार का हा प्रश्न आहे.
जनशताब्दी एक्सप्रेसने तात्काळ काम असल्याने प्रवास करण्यासाठी परभणी रेल्वे स्थानकावर(Railway station) आलो. तेथे करंट बुकिंग खिडकी नसल्यामुळे जनरल तिकीट काढून प्रवास करत होतो. प्रवासादरम्यान टीटीई तिकीट तपासणीस आल्यानंतर नियमानुसार दंड भरून पावतीची मागणी केली. मात्र टीटीईने फक्त 100 रुपये मागितले आणि ते स्वतःच्या खिशात टाकले.