परभणी (Jintur Hospital) : जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयातील बेडवर चक्क कुत्रे आरामात पहुडलेले दिसल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या धक्कादायक घटनेने आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था समोर आली आहे. रुग्णांना उपचार मिळावेत म्हणून असलेल्या बेडवर जनावरे विसावत असतील, तर प्रशासनाचा निष्काळजीपणा कोणत्या थराला गेला आहे, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
यापूर्वीही या (Jintur Hospital) रुग्णालयात चक्क सर्प निघाल्याची घटना घडली होती, त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तरी देखील आरोग्य विभाग प्रशासन अजूनही टवाळखोर वृत्तीने वागत असून, किती निष्काळजी झाले आहे हेच यावरून स्पष्ट होत आहे. रुग्णालयातील स्वच्छता आणि शिस्तीचा पूर्ण बोजवारा उडाल्याचे वास्तव आता उघड झाले आहे. औषधोपचार आणि सुविधा तर दूरच, पण (Jintur Hospital) रुग्णालयातील सुरक्षा, व्यवस्थापन व जबाबदारीच ठप्प झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
या प्रकारामुळे (Jintur Hospital) रुग्णांना संसर्गजन्य आजारांचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, तरीही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही तत्पर कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. नागरिकांनी वैद्यकीय अधीक्षकांवर तातडीने कठोर कारवाई करून रुग्णालयातील स्वच्छता व व्यवस्थापन सुधारण्याची मागणी केली आहे.
वैद्यकीय अधीक्षकांचे स्पष्टीकरण
या घटनेबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकिरण चांडगे यांनी सांगितले की, “सदर प्रकार १४ ऑगस्ट रोजीचा असून, सेवा बजावत असलेल्या दोन ते तीन कर्मचार्यांवर योग्या ती कारवाई करण्यात येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.