तर साजरे करणार नाही रक्षाबंधन -पृथ्वीराज गायकवाड
बुलढाणा () : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांचे क्रुर हत्याकांड घडवून आणणारे आरोपी व बुलढाणा येथे मद्यधुंद चालकाच्या भरधाव वाहनाच्या धडकेत स्नेहल चौधरी या युवतीचा झालेला दुदैवी मृत्यू ..या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी धर्मवीर युथ फाऊंडेशनने पुकारलेल्या बंदला बुलढाणा शहरातील व्यावसायीकांना १०० टक्के बंद पाळल्याने शहरात शुकशुकाट पहायला मिळाला. यावेळी बोलतांना धर्मवीर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड यांनी जोपर्यंत स्नेहलच्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत हातात राखी बांधणार नाही..अशी प्रतिज्ञा घेतली.
सोमवार १० मार्च रोजी धर्मवीर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड यांच्या आयोजनात बुलढाणा बंदची हाक देण्यात आली होती. त्यात विविध संघटना तथा शहरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. सर्वप्रथम ‘शिवनेरी’ जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलापुढे नागरिक जमले. यात विद्यार्थीनींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. याठिकाणी मुलींसंदर्भात पथनाट्य सादर करण्यात आले. नंतर संगम चौक, जयस्तंभ चौक, आठवडी बाजार, कारंजा चौक मार्गे ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचली.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचेकडे एका शिष्टमंडळाने निवेदन दिले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मारेकर्यांवर कठोर कारवाई करुन फाशीची शिक्षा, शहरातील वाहतूक व रहदारी व्यवस्थेचा बळी स्नेहलताई चौधरी यांना न्याय मिळणे तसेच शाळा कॉलेज समोरील चिडीमारी, महिला मुलींवरील होणारे अन्याय, अत्याचारातील वाढ, युवक व्यसनाधीनता यावर नियंत्रण व कठोर कारवाई करण्याची मागणी निवदनातून करण्यात आली. या मोर्चोत धर्मवीर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड, शिवसेना नेते विजय अंभोरे, अनुजाताई सावळे, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, गजेंद्र दांडदे, वैशालीताई ठाकरे, वर्षाताई तायडे, आशीष जाधव, श्रीकांत गायकवाड, श्रीकृष्ण शिंदे, शुभम दांडदे, तुषार राजपूत, प्रतिक वाकोडे, सुरज देशमुख, अजय हडाले, युवराज शिराळ, गोलू सुरुशे, शिवा घडेकर, सचिन हिरोळे यांच्यासह बुलढाणेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
धर्मवीर फाऊंडेशन लढणार केस..
स्नेहल चौधरी मृत्यू प्रकरणातील मद्यधुंद चालकाला तेंव्हाच जमानत झाली होती, परंतु या प्रकरणातील वस्तुस्थिती धर्मवीर फाऊंडेशनने पुढे आणल्यावर त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होवून तो अजुनही सुटू शकला नाही. त्या आरोपीला जोपर्यंत कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत स्नेहलचा एक भाऊ म्हणून आपण हातात राखी बांधणार नसल्याचे यावेळी पृथ्वीराज गायकवाड यांनी बोलतांना सांगितले.
धर्मवीर अन्यायाला वाचा फोडणारे..
धर्मवीर हे अन्यायाला वाचा फोडणारे युथ फाऊंडेशन असून यामाध्यमातून पृथ्वीराज गायकवाड करीत असलेले काम खूप मोठे असल्याचे यावेळी ज्येष्ठ नेते विजय अंभोरे व महिला नेत्या अनुजाताई सावळे यांनी सांगितले. बुलढाणा शहर व मतदार संघात धर्मवीर फाऊंडेशनने संवेदनशिल विषयात काम केल्याचेही ते म्हणाले. मोर्चाचे आभार प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराज जयंती समिती अध्यक्ष राजेंद्र काळे यांनी केले.