अनेक इच्छूक उमेदवारांनी घेतले अपक्ष भरण्यासाठी अर्ज
मानोरा (Karanja-Manora Assembly) : विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी जाहीर करताना सर्वच पक्षांना बंडखोरी होण्याच्या भीतीने ग्रासले आहे. त्यामुळे अजुनही कारंजा – मानोरा विधानसभा मतदारसंघात (Karanja-Manora Assembly) महाविकास आघाडी व महायुतीने अद्यापही उमेदवारी जाहीर केलेली नाही. मात्र उमेदवारी मिळण्याच्या चर्चेने वेग घेतल्याने आता बंडखोर अपक्ष उमेदवार आपल्याला तिकीट मिळणार नसल्याने उमेदवारी दाखल करण्याची तयारी करीत आहेत. तर उमेदवारी कॅन्सल झाल्याची चुणूक लागताच अनेकांनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्यासाठी अर्ज जवळ केले आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघामध्ये (Karanja-Manora Assembly) अनेकांनी निवडणूक लढविण्यासाठी रणशिंग फुंकले होते. महायुती व महा विकास आघाडीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छूक असलेले उमेदवार सहा महिन्यापासून निवडणूक लढविण्याची तयारी करीत होते. मात्र राज्य पातळीवरून आता निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी वेगळ्याच नावाची घोषणा होण्याची शक्यता असल्याने अनेकांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी चालविली आहे. उमेदवारी जाहीर होण्याचे संकेत असलेले उमेदवार शक्ती प्रदर्शन करण्यासाठी कार्यकर्ते यांच्याशी समन्वय साधत आहेत. या सोबतच बंडोबा देखील अपक्ष किंवा मिळेल त्या पक्षाकडून अर्ज घेत असल्याचे दिसत असताना या बंडोबांना कसे थोपवावे असा प्रश्न महायुती व महाविकास आघाडी समोर उभा ठाकला आहे.
कारंजा – मानोरा विधानसभा मतदारसंघ (Karanja-Manora Assembly) पारंपारिक रित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होता व मागील दहा वर्षांपासून भाजपा पक्षाचे या मतदार संघात आमदार आहेत. यावेळी स्व पक्षाचे उमेदवार सोडून इतर पक्षातून आयात केलेल्या उमेदवाराला तिकीट मिळणार असल्याची मतदार संघात खमंग चर्चा आहे.
पक्षश्रेष्ठीचे नेते, पुढारी चिंतेत!
विधानसभा मतदार संघातील (Karanja-Manora Assembly) उमेदवारी अजूनही जाहीर झालेली नाही. मात्र मतदार संघात महायुती व महा विकास आघाडीकडून पक्षाचे निष्ठावंताना डावलून उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याने निष्ठावंत बंड पुकारण्याचा मार्गावर आहेत. त्यामुळे निवडणूकीत पक्षश्रेष्ठीमधील नेते व पुढारी चिंतेत सापडले आहेत.