भंडारा/सेंदूरवाफा (Laborer Death) : मालकाच्या हलगर्जीपणामुळे लांजी बालाघाट येथे पत्ता सिझनवर गेलेल्या साकोली तालुक्यातील उमरी येथील मजूराचा प्रकृती बिघडल्याने हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना दि.३० मे २०२५ रोजी उघडकीस आली असून अनिरूद्ध मारोती बडोले वय ५२ असे मृतक मजूराचे नाव आहे.
सविस्तर असे की मृतक अनिरूद्ध बडोले परिस्थिती बेताची असल्याने (Laborer Death) मजूरीनिमित्ताने लांजी बालाघाट मध्यप्रदेश येथे एक महिना अगोदर पत्ता सिझनवर लांजी बालाघाट येथे गेले होते.
दि.२८ मे पासून त्यांची प्रकृती बरी नव्हती मात्र फळी मालकाने त्यांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले व कुठल्याही चांगल्या रुग्णालयात उपचार केले नाही. दि.३० मे रोजी प्रकृती जास्त बिघडल्यानंतरही मालकाने लांजी किंवा जवळच्या कोणत्याही दवाखाण्यात भरती न करता बडोले यांना खाजगी गाडी करून त्यांच्या गावी उमरी येथे परत पाठविले.
मात्र रस्त्यात प्रकृती खूपच बिघडल्याने त्यांना सरळ साकोली येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. सायं.५ वाजेदरम्यान रूग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. शवविच्छेदनानंतर अत्यंत शोकाकूल वातावरणात दि.३१ मे २०२५ रोजी स.११ वाजता अनिरूद्ध बडोले यांच्या पार्थिवावर उमरी येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूपश्चात पत्नी, अनुक्रमे १७ व १४ वर्षांच्या दोन मुली व दोन वर्षांचा एक चिमूकला मुलगा आहे.
घरातील कर्ता कमावता पुरूष गेल्याने या कुटुंबावर खूप मोठा आघात झाला असून लहान लहान अपत्ये बापाविना पोरके झाले आहेत. बडोले यांच्या अशा अकाली निधनाने परिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर (Laborer Death) वेळीच उपचार झाले असते तर त्यांचा जीव वाचू शकला असता अशी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मालकाकडून मृतक बडोले यांच्या कुटुंबियांना काही मदतीची अपेक्षा आहे.